अमरावती : यंदा खरीप हंगामात अनियमित पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादकतेवर परिणाम झाला. उत्पादन कमी झाल्याने बाजारात चांगले दर मिळतील, ही शेतक-यांची अपेक्षा फोल ठरली आहे. सोयाबीनची काढणी होऊन दोन महिने झाले, तरी सोयाबीनचे दर पाच हजारांवर गेलेले नाहीत. सध्या शेतक-यांना सोयाबीन हमीभावापेक्षा कमी दरात विकावे लागत आहे. सोयाबीन विकावे की प्रतीक्षा करावी या विवंचनेत शेतकरी दिसून येत आहेत.
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत किमान ४ हजार ५०० तर कमाल ४ हजार ६७९ म्हणजे सरासरी ४ हजार ६४१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. अकोला बाजार समितीत सरासरी ४ हजार ६३५ रुपये, तर वाशीम बाजार समितीत सरासरी ४ हजार ५५० रुपये दर मिळाला. सोयाबीनचे हमीभाव ४ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल इतके आहेत. पश्चिम विदर्भातील अनेक बाजार समित्यांमध्ये हमीभावाइतके किंवा त्यापेक्षा कमी दर मिळत आहेत.
गेल्या हंगामात सोयाबीनचे हमीभाव ४ हजार ३०० रुपये इतके होते. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेल स्वस्त झाल्याने विक्रमी आयात झाली. स्वस्त खाद्यतेल देशात आल्याने सोयाबीनच्या दरावर परिणाम झाला. सध्या कमी भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. साधारणत: दिवाळीच्या सुमारास खरीप हंगामातील सोयाबीन शेतक-याच्या घरात यायला सुरुवात झाली. त्या वेळीसुद्धा सोयाबीनचा दर आजच्या दरांएवढाच होता. गरजू शेतक-यांनी मिळेल त्या भावात व्यापा-यांना त्यावेळी सोयाबीन विकून टाकले. पण ब-याच शेतक-यांनी भविष्यात भाववाढ होईल या आशेने सोयाबीन साठवून ठेवले आहे.