जिंतूर : शहरातील मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त दि. ६ जानेवारी रोजी पत्रकार भवनात अनेक मान्यवर मंडळींसह शहरी व ग्रामीण भागातील पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत दर्पण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार एम.ए. माजिद, प्रमुख पाहुणे तहसीलदार राजेश सरवदे, उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग गोफणे, पोलीस निरीक्षक दिलीप तिडके, नायब तहसीलदार प्रशांत राखे, राष्ट्रवादी काँग्रेस युवती जिल्हाध्यक्षा प्रेक्षा भांबळे, गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले, डॉ जुनेद खान, गणेश इलग, रंजना देवशी, आशा खिल्लारे, संघाचे अध्यक्ष शेख शकील अहमद आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी प्रेक्षा भाबळे म्हणाल्या की, वृत्तपत्र समाजाचे दर्पण आहे. पत्रकारांच्या मनातील सुप्त इच्छा, आकांक्षा, वेदना समाजाने समजून घेण्याची आवश्यकता आहे. या वेळी तहसीलदार राजेश सरवदे म्हणाले की, जावयाच्या घरात आणि पत्रकारांच्या कार्यक्रमात जपून कमी बोलावे. लोकशाहीमध्ये पत्रकारांचे स्थान अभेद्य आहे. ब्रिटिश काळात दर्पण हे अन्यायाला वाचा फोडणारे असे वृत्तपत्र तयार झाल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. तर दर्पण या नावातच सर्वकाही आहे. त्या काळातील पत्रकारिता आणि आताच्या पत्रकारितेचे स्वरूप बदलले असून मीडियामध्ये तंत्रज्ञान वाढल्याची माहिती त्यांनी आपल्या मनोगतच्या माध्यमातून सांगितली. पत्रकारांनी आपली लेखणी अबाधित ठेवण्याचे काम मराठी वृत्तपत्रसृष्टीमध्ये कायम ठेवल्याचे सांगितले. पत्रकारिता क्षेत्र नवनवीन बदल आणि आव्हाने पेलण्यासाठी सक्षम असल्याचे आजपर्यंतच्या प्रवासातून दिसून आल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
प्रास्ताविकात पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणाले की वृत्तपत्रे, समाजमाध्यमांवर विश्वास ठेवणारा मोठा वर्ग अस्तित्वात आहे. पत्रकारांच्या सुप्त वेदना समजून घेऊन शासनाने धोरणात आमूलाग्र बदल करावा. शासनाने पुढाकार घेऊन पत्रकारांसाठी प्रोत्साहनपर मदत तातडीने जाहीर करावी, अशी मागणी या वेळी केली. या कार्यक्रमाला बोरी, चारठाणासह ग्रामीण व शहरी भागातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाचे कार्याध्यक्ष बालाजी शिंदे सचिव ज्ञानेश्वर रोकडे, महेश देशमुख यांच्यासह सर्व कार्यकारणी सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शहेजाद खान पठाण तर आभार शेख अलीम यांनी मानले.
जागेसाठी प्रयत्न करणार
पत्रकार संघाचे अध्यक्ष शकील अहेमद यांनी सांगितले की, कि पत्रकार बांधव नेहमीच बातम्यासाठी अथक परिश्रम घेत असतो. त्यांना कोणतेही मानधन नसते. त्यामुळे अनेक पत्रकार बांधवाना रहाण्यासाठी योग्य घर देखील नाही. त्यामुळे तहसीलदार राजेश सरोदे यांनी प्रयत्न केल्यास निश्चितच आम्हाला शासनाकडून जागा द्यावी म्हणून साकडे घातले. तहसीलदार सरोदे यांनी निश्चितच प्रयत्न करेल असे आश्वासित केले आहे.