सोलापूर – सोलापूर होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. दरम्यान सध्या सुरू असलेल्या धावपट्टी, संरक्षक भिंत, मुख्य प्रशासकीय इमारत, पार्किंग आदी विकासकामे तात्काळ पूर्ण करावीत. काही कामे अंतिम टप्प्यात आली असून उर्वरित कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना सोलापूर विमानतळ प्राधिकरण समितीचे चेअरमन तथा खा.डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी दिल्या.
होटगी रोड विमानतळ येथून लवकर विमानसेवा सुरु होण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांची व कंत्राटदारांची संयुक्त बैठक विमानतळ प्राधिकरण सोलापूरचे चेअरमन खा. डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत सर्व संबंधितानी होटगी रोड विमानतळच्या अनुषंगाने प्रलंबित मुद्दयांचे अनुषंगाने व केलेल्या कार्यवाहीची अद्यावत माहिती दिली. सदर अडीअडचणीच्या अनुषंगाने व विमानतळ सुरु करण्यासाठी आवश्यक ती अद्यावत, सविस्तर माहिती भारतीय विमानतळ प्राधिकरण सोलापूरचे व्यवस्थापक बनोथ चांपला यांनी दिली.
सुरुवातीला सद्यपरिस्थितीत सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली. या सर्व कामांना कार्यारंभ आदेश कधी दिला तेंव्हापासून आजतागात किती काम पूर्ण झाले याची माहिती घेतली. खा.डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी फेब्रुवारी अखेर कामे पूर्ण करण्याबाबत सूचना केली होती परंतु ती अद्याप सुरू आहेत. धावपट्टीचे दुसऱ्या थराचे काम संपवून तिसऱ्या थराचेही काम 15 एप्रिल पर्यंत पुर्ण करा. मुख्य प्रशासकीय इमारत सह सर्व कामे वेगाने करावीत. गेल्या आठवड्यात मी होटगी रोड सोलापूर विमानतळाची पाहणी केली होती. येणाऱ्या चार पाच आठवड्यात ही कामे पूर्ण करण्याच्या सूचना खा.डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. सदर बैठकीस खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, भारतीय विमानतळचे व्यवस्थापक, महापालिका, पोलीस प्रशासन आदी सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणांचे अधिकारी, कंत्राटदार उपस्थित होते.