मुंबई : प्रतिनिधी
ज्येष्ठांना मोफत प्रवास, महिलांना निम्म्या दरात एसटी प्रवास अशा घोषणा महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधी केल्या. या घोषणांची अंमलबजावणीही लगेच सुरु झाली. ज्येष्ठांना एसटीचा प्रवास, महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास याच्या जाहिरातीदेखील प्रचार काळात पाहायल्या मिळाल्या. पण राज्यात महायुती सरकार स्थापन होण्याच्या हालचाली सुरू असतानाच आता एसटी बस प्रवास महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण एसटी महामंडळाने एसटी बस प्रवासभाड्यात १४ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव आधीच राज्य सरकारकडे देऊन ठेवला आहे. आता नवे सरकार स्थापन होताच यावर निर्णय होऊ शकतो.
एसटी महामंडळाने शासनाला तिकिटाचे दर वाढविण्याचा प्रस्ताव निवडणुकीपूर्वीच दिला होता. परंतु निवडणुकीच्या पुढे जनतेवर तिकीट दरवाढीचा बोजा टाकण्याऐवजी अधिकाधिक सवलती दिल्या. आता नवे सरकार सत्तेत आल्यानंतर दरवाढीचा प्रस्ताव मंजूर होण्याची दाट शक्यता आहे. १४ टक्क्यांची भाडेवाढ करण्याची मागणी प्रस्तावातून करण्यात आली आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास त्याची झळ सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. एसटी महामंडळाचा प्रस्ताव ३ वर्षांचा आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यावर भाडेवाढीबद्दल अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने महामंडळाचा प्रस्ताव स्वीकारून दरवाढ लागू केल्यास मुंबई-पुणे एसटी प्रवास ५० ते ६० रुपयांनी महाग होऊ शकतो. २०२१ मध्ये एसटीने अखेरची दरवाढ केली होती. त्यानंतर गेल्या ३ वर्षांत कोणतीही दरवाढ झालेली नाही. कर्मचा-यांचे वाढते वेतन, इंधनावरील वाढता खर्च, सुट्याभागांचे वाढलेले दर, टायर आणि लुब्रिकंटच्या वाढलेल्या किमती यामुळे एसटी महामंडळाचा तोटा वाढत चालला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने निवडणुकीआधीच सरकारला दरवाढीचा प्रस्ताव दिला होता. पण तो मान्य करण्यात आला नाही. सरकारने प्रस्ताव राखून ठेवला होता. आता नवे सरकार सत्तेत येताच या प्रस्तावावर निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.
प्रतिशंभर रुपयांवर १५ रुपयांचा भुर्दंड?
एसटी महामंडळाने दिलेल्या प्रस्तावानुसार १४.१३ टक्के वाढ मंजूर झाल्यास सध्याच्या १०० रुपयांच्या तिकिटासाठी १५ रुपये जास्त मोजावे लागू शकतात. महामंडळाने आधी १२.३६ टक्क्यांची भाडेवाढ सूचवली होती. पण त्यानंतर त्यात सुधारणा करून त्यात वाढ करण्यात आली.
रोज १५ कोटींचा तोटा
महायुती सरकारने निवडणुकीच्या अगोदर लाडक्या बहिणींना एसटी बस प्रवासात सवलत दिल्याने प्रवासी वाढले. त्यामुळे एसटी महामंडळ फायद्यात असल्याचा दावा केला होता. परंतु सद्यस्थितीत एसटी महामंडळाला दररोज १५ कोटी रुपयांच्या आसपास तोटा होत असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. हा तोटा भरून काढण्यासाठीच एसटी महामंडळाने एसटी बस प्रवासाच्या भाड्यात वाढ करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे.