26.8 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeमहाराष्ट्र‘एसटी’च्या सवलती सुरूच राहणार

‘एसटी’च्या सवलती सुरूच राहणार

लाडकी बहीणीसह इतर सवलतींवर उपमुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही

मुंबई : महायुती सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना तसेच एसटी मधील तिकीट दरात सवलत बंद होणार नाही. या योजना लाडक्या बहिणीसाठी कायम सुरू राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी एसटीमधील महिलांना आणि ज्येष्ठांना असणा-या सवलती बंद करणार असल्याचे वक्तव्य केले होते. यावरून विरोधक आक्रमक झाले असता थेट तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णयच रद्द करणार असल्याचा आरोप झाल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्टोक्ती दिली आहे. उद्धव ठाकरे यांना धक्का दिला जात असल्याच्या बातम्या मी सातत्याने वाचत आहे.

मात्र, मला एवढे धक्के बसले की आता मी धक्का पुरुष झालो असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. इतकेच नाही तर मी त्यांना एकच धक्का देईल की ते दिसणारच नाहीत, असा इशारा देखील त्यांनी शिंदे यांना दिला होता. यावर देखील एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे. पक्ष वाढवणा-या, पक्षासाठी चांगले काम करणा-या नेत्यांना धक्के देऊन त्यांनी पक्षातून बाहेर काढले. त्यामुळे विधानसभेला नागरिकांनीच उद्धव ठाकरे यांना धक्का देऊन घरी बसवले असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

राज्यातील जनता माझ्यासोबत
महाराष्ट्रातील जनतेने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना धक्का देणा-यांना विधानसभेला धक्का देऊन घरी बसवले. असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारने जे काम केले, ते काम पाहूनच विधानसभा निवडणुकीत नागरिकांनी आम्हाला मतदान केले असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. माझ्यावर कितीही आरोप करा, कितीही शिव्या द्या, मात्र महाराष्ट्रातील जनता माझ्यासोबत आहे, तोपर्यंत कोणीही काहीही करू शकणार नसल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

महिलांना दिलेल्या सवलतीमुळे एसटी तोट्यात नाही
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. त्याचबरोबर एसटी महामंडळांच्या बसेसमध्ये महिलांना ५० टक्के सवलत दिलेली असून ही योजना देखील बंद होणार नाही असे देखील एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. प्रवाशांना दिलेले वचन आम्ही पाळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना दिलेल्या सवलतीमुळे एसटी तोट्यात आली नसल्याचे देखील त्यांनी सांगितले. या माध्यमातून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेला दावा एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावला आहे.

आमची शिवसेना मजबूत कंपनीचे शेअर
आमची शिवसेना मजबूत कंपनीच्या शेअर सारखी आहे. लोक आमच्यावर विश्वास ठेवत आमच्या सोबत येत आहेत. आमची शिवसेना मजबूत कंपनीचे शेअर आहेत. त्यामुळे बाजारात कितीही चढ उतार असला तरी लोक कायमच चांगले शेअर खरेदी करतातच, असे म्हणत त्यांनी पक्षात येणा-या नागरिकांचे स्वागत केले. मी बाळासाहेब आणि दिघे साहेबांचा कार्यकर्ता आहे. मला हलक्यात घेऊ नका, हा माझा इशारा आहे. ज्याला समजून घ्यायचा त्यांनी समजून घ्याव्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR