मुंबई : गणेश उत्सवाला राज्य सरकारच्या वतीने राज्योत्सव म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या उत्साहात बाजारात पैशांची कमतरता राहु नये, त्यासाठी राज्य सरकारच्या सर्व कर्मचा-यांना गणेशोत्सवापूर्वीच पगार देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र त्याचबरोबर याचा लाभ एसटी महामंडळातील कर्मचा-यांनाही होणार आहे.
दरवेळी उशिरा पगार मिळणा-या राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांना मात्र गणेशोत्सवाच्या पूर्वीच वेतन मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाखो एसटी महामंडळातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबाबत लवकरात लवकर पावले उचलण्याचे निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिका-यांना दिले आहेत.
याबाबत अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्थ मंत्रालयाच्या वतीने सोमवारपर्यंत कर्मचा-यांच्या पगाराच्या फाईल मंजूर झाल्या तर एसटी कर्मचा-यांना सोमवार किंवा मंगळवारी पगार मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायमच उशीरा पगार होत असल्याची खंत व्यक्त करणा-या या कर्मचा-यांना यावेळी वेळेच्या आधीच आणि सणासुदीच्या काळामध्ये हातात पैसा येणार आहे.
एसटी कर्मचा-यांचा पगाराबाबत कायमच नाराजी व्यक्त केली जाते. एसटी कर्मचा-यांना नियमित पगार मिळत नाही. अनेकदा तर महिन्याच्या शेवटी किंवा एका महिन्याचा पगार दुस-या महिन्यात मिळत असल्याने कर्मचा-यांनी नेहमीच नाराजी व्यक्त केली आहे. सणासुदीच्या काळात देखील या कर्मचा-यांच्या हातात वेळेवर पैसा दिला जात नाही. त्यामुळे महामंडळातील कर्मचा-यांना वेळेवर पगार मिळावा. यासाठी सातत्याने आंदोलने करण्यात आली आहेत. मात्र आता या गणेशोत्सवात एसटी कर्मचा-यांना उत्सवाच्या आधीच पगार मिळण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने या कर्मचा-यांसाठी ही दिलासादायक बातमी मानली जात आहे.