देवळा : देवळा शहरानजीक असलेल्या सप्तशृंगी-नगरजवळ एसटी बसचा अपघात झाला. कळवण-मालेगाव (एमएच ०७ सी ९१०८) या बसचा गुरुवारी (दि. ४) रात्री साडेसातच्या सुमारास झाडावर आदळल्याने अपघात झाला. यामध्ये चालक-वाहकासह बसमधील जवळपास १६ प्रवासी जखमी झाल्याने त्यांना तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्राथमिक माहितीनुसार बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्यातून हा अपघात झाला. यात टायर फुटल्यामुळे बस झाडावर आदळली. जखमींना पुढील उपचारासाठी इतर ठिकाणी संदर्भित करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, कळवण आगाराची कळवण-मालेगाव बस गुरुवार (दि. ४) रोजी देवळा शहरात प्रवेश करण्यापूर्वी सप्तशृंगीनगराजवळ वेगाने येत असताना पहिल्यांदा उजव्या साईडच्या विजेच्या खांबाला धडक देत व त्यानंतर डाव्या बाजूच्या चिंचेच्या झाडावर धडकली.
रात्री साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. बसची पुढची डावी बाजू पूर्ण चेपली गेली असून बसचेही मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यावेळेस या बसच्या मागेपुढे कोणतेही वाहन नसल्याने पुढील अनर्थ टळला.