सोलापूर : एसटीच्या प्रवाशांना सोलापूर एसटी विभागाने नव्या वर्षाचे गिफ्ट दिले आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार सोलापूरहून मुंबईसाठी शयनयान गाडी सुरू केली आहे. या गाडीला पहिल्या दिवशी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ही गाडी मेगा हायवेवरून जाणार असल्याने नेहमीपेक्षा जवळपास एक ते दीड तास या गाडीला कमी वेळ लागत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, या गाडीचा शुभारंभ प्रवासी दांपत्याच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला.
खासगी वाहनातून रात्री प्रवास करताना अनेक प्रवाशांना वाटणारी भीती यासाठी रात्री मुंबईसाठी शयनयान गाडी सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात होती. यामुळेच आता सोलापूरहून मुंबईसाठी दररोज रात्री शयनयान गाडी सोडण्यात येणार आहे. दररोज सायंकाळी साडेनऊ वाजता ही गाडी सोलापूरहून मुंबईकडे मार्गस्थ होईल. ही गाडी पुण्याला गेल्यानंतर तेथून मेगा हायवेवरून जाणार आहे. यामुळे या गाडीला जवळपास एक ते दीड तास वेळ कमी लागत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, गाडीचे उद्घाटन प्रवासी दामत्य यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एसटीचे आगार व्यवस्थानकः उत्तम जुंधळे व इतर एसटीतील कर्मचारी आणि प्रवासी उपस्थित होते.
खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सोलापूरहून मुंबईसाठी विशेष शयनयान गाडी सुरू करण्यात आली आहे. या गाडीत ३० सीट आहेत. गाडीला नऊशे रुपये मोजावे लागणार आहेत. पण यातून आरामदायी प्रवास होणार आहे. पूर्वी अमरावती ते सोलापूर ही शयनयान गाडी सुरू होती. ही गाडी आता सोलापूर आगाराला मिळाली आहे. यामुळे सोलापूर आगारातून मुंबईसाठी गाडी सुरू करण्यात आल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली. या गाडीला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला, पहिल्या दिवशी जवळपास तीस हजार रुपयांचे उत्पन्न या गाडीच्या माध्यमातून मिळाले. या नव्या गाडीचा प्रवाशांनी लाभ घ्यावा.असे आवाहन सोलापूर आगार व्यवस्थापक उत्तम जुंधळे यांनी केले आहे.