लातूर : लातूर परिसरातून देशांतर्गत प्रवाशांची संख्या भरपूर असून लातूर विमानतळावरून देशाची राजधानी दिल्ली, हैदराबाद आणि मुंबई येथे प्रवासासाठी देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यासाठी येथील खासदार डॉ. शिवाजी बंडप्पा काळगे यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजारपू राममोहन नायडू यांची भेट घेऊन निवेदन सादर करीत मागणी केली.
सदर विमानतळावरून अद्यापही देशांतर्गत विमानसेवा सुरू न झाल्यामुळे मोठ्या संख्येने हवाई प्रवाशांना विशेषत: व्यापारी, प्रतिष्ठित व्यक्तींना अनेक तासांचा कंटाळवाना प्रवास करीत इतर मार्गांचा अवलंब करावा लागत आहे. यामुळे आपण विनंती करतो की, लातूर येथील प्रवाशांच्या व्यापक आणि सार्वजनिक हित आणि या प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी तातडीच्या आणि महत्त्वाच्या समस्येकडे लक्ष द्यावे असे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी निवेदनातून म्हटले आहे.