मुंबई : शिवडी-न्हावा शेवा पूल सुरू करा अन्यथा आम्ही सुरू करू, असा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारला दिला आहे. निवडणुका आल्या म्हटल्यावर आता सगळीकडे यांचेच होर्डिंग आणि पोस्टर दिसतील.
अगदी तुमच्या आरशातही हेच दिसतील, असा टोला आदित्य ठाकरेंनी सरकारला दिला आहे. दक्षिण मुंबईतील गिरगावमध्ये आदित्य ठाकरेंची सभा पार पडली. यावेळी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नक्कल करत सरकारवर टीका केली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, गुजरातला जाणा-या बुलेट ट्रेनसाठी जमीन मोफत देण्यात आली आहे. पण आमच्या मुंबई-नवी मुंबई प्रवासासाठी २५० रुपये मोजावे लागणार आहेत. उद्घाटनासाठी वेळ नाही तसेच दिल्लीकडून तारीख मिळत नाही. रोड जर जनतेसाठी लवकर खुला केला नाही तर मात्र आम्ही स्वत: जाऊन तो रस्ता जनतेसाठी खुला करू. तुम्हाला दिल्लीला उत्तर द्यायचे आहे पण मला या माझ्या महाराष्ट्राच्या जनतेला उत्तर द्यायचे आहे.