मुंबई : सध्या डिजिटल इंडियानंतर एआय इंडिया असेच पाहायला मिळत आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) म्हणजेच एआयचा वापर सर्वच क्षेत्रात करण्यासाठीची धडपड दिसून येत आहे. त्यामुळे, शासनाने देखील एआयसाठी धोरण आखायला सुरुवात केली असून महाराष्ट्राची एआय पॉलिसी एप्रिल महिन्यात येईल अशी घोषणाच माहिती व तंत्रज्ञानमंत्री आशिष शेलार यांनी विधानपरिषद सभागृहात आज केली.
भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांच्याकडून आर्टिफिशियल इंटिलिजन्स संदर्भात प्रश्न मांडण्यात आला होता. त्यावर मंत्री शेलार यांनी उत्तर दिले. दरम्यान, यावेळी शेलार यांनी एआयचा मजेशीर किस्साही सांगितला. त्यावरून, आमदार अनिल परब आणि आशिष शेलार यांच्यात चांगलीच मिश्कीलपणे जुगलबंदी रंगली. केरळ आयरस अशी एक एआय टिचर निर्माण करण्यात आली आहे. तंत्रज्ञान आले त्यानंतर पाठ राहिले नाहीत, आर्टिफिशिअल संदर्भातले नवे आव्हान आपल्यासमोर आहे. चांगल्या दृष्टीने शिक्षणात हे येणे क्रांती ठरेल, आपण यासंदर्भात एक समग्र धोरण आणावे असा प्रश्न श्रीकांत भारतीय यांनी उपस्थित केला होता. त्यावर, आता आशिष शेलार यांनी सभागृहात उत्तर दिले.
एआय ही उद्याची भाषा जी जगाने ठरवली आहे, दीड दोन आठवड्यात एकच चर्चा लावली आहे. जगातील नवीन संधी आणि आव्हानांचे स्वरुप एआयच्या रुपाने आलेले आहे. संशोधन, रोजगार निर्मिती ज्ञान मिळवण्याची व्यवस्था आपण इंटरनेट आल्यानंतर बघितली. एआयच्या सहाय्याने सर्वत्रच मूलभूत क्षेत्रात बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मग हे आव्हान आहे की अडचण आहे, असा प्रश्न उपस्थित होतो.
सन २०२४ ला नीती आयोग, केंद्रातील विभाग, तज्ज्ञांकडून भारतीय एआय धोरण लाँच केले गेले. आता, आपण यासंदर्भात टास्क फोर्स बनवला आहे, एआयचा उपयोग होणार असेल तर नेमके होणार काय? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्यामुळे, राज्याची एआय पॉलिसी एप्रिल महिन्यात येईल, अशी माहिती माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी दिली. शिक्षणात पूरक व्यवस्था निर्माण करण्यासाठी नियम धोरण बनवावे लागेल, त्यासाठी समिती नेमू. शिक्षण तज्ज्ञ, पालक आणि शिक्षक हे सर्व त्या समितीमध्ये असतील असेही शेलार यांनी यावेळी, सांगितले.
एआय पालकमंत्रीवरून जुगलबंदी
राज्याच्या एआय धोरणाबाबत विधानपरिषदेत चर्चा सुरू असताना एआयचे परिणाम आणि दुष्परिणामावर चर्चा सुरू होती. त्यावेळी पालकमंत्रीपदाबाबत आपण प्रश्न विचारला होता, कोणत्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री मिळणार असा प्रश्न मी एआयला विचारला होता असे मंत्री आशिष शेलार यांनी म्हटले. तेव्हा एआयने सांगितल्यानुसार महाराष्ट्रातील ८० टक्के जिल्ह्यांचे पालकमंत्री नेमले गेल्याचे उदाहरण आशिष शेलार यांनी सभागृहात दिले. शेलार यांच्या या उदाहरणावर अनिल परब यांनी मिश्लिल टोला लगावला.
नाशिक आणि रायगडचे पालकमंत्री देखील एआयला निवडायला सांगा असे परब यांनी म्हणताच विधानपरिषदेत एकच हशा पिकला. तर, एआय तो तिढा सोडवू शकणार नाही असे आशिष शेलार यांनीही गमतीत म्हटले. त्यावर तिथे एआय नाही तर आय-माय आहे असे अनिल परब यांनी म्हटले. तर आय माय नाही आयना का बायना आहे, असे उत्तर पुन्हा आशिष शेलार यांनी दिले. त्यामुळे, एआय आणि पालकमंत्री पदावरुन विधानपरिषदेत चांगलीच मिश्कील जुगलबंदी पाहायला मिळाली. दरम्यान, यावेळी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील सभागृहात उपस्थित होते.