मुंबई : प्रतिनिधी
राज्यात तापमानाचा पारा चढला आहे. बहुतांश ठिकाणी ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद होत आहे. त्यामुळे आतापासूनच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. होळीदिवशी राज्यातील धरणांमध्ये सरासरी ५३.४१ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले. मागील वर्षीच्या तुलनेत साधारणत: १० टक्के पाणीसाठा अधिक आहे.
गेल्यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, अवकाळी पावसाचा फटका, प्रचंड तापमान आणि हवामानातल्या टोकाच्या बदलांनी अनेक धरण साठे शून्यावर गेले होते. मात्र, मागच्या पावसाळ््यात जोरदार पाऊस झाला आणि धरणे तुडुंब भरली. परंतु यंदा फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच उन्हाच्या झळा जाणवल्याने धरणांतील पाण्याची पातळी लवकर खालावण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आता ब-याच धरणातील पाणीसाठी कमी झाल्याचे चित्र आहे. राज्यात धरणांतील पाणी पातळी खालावल्याने आता पाणीसाठा सरासरी ५३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
राज्यात लघु मध्यम आणि मोठ्या अशा एकूण २९९७ धरणांमध्ये होळीच्या दिवशी ५३.४१ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. नागपूर व अमरावती विभागात ४९.३० टक्के आणि ५७.८८ टक्के पाणीसाठा आहे. मराठवाड्यातील ९२० धरणांमध्ये ५२ टक्के पाणी शिल्लक असून मागील वर्षी याच सुमारास मराठवाड्यात केवळ २३.५३ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. नाशिकच्या ५३७ धरणांमध्ये आज ५३.६८ टक्के पाणी शिल्लक आहे. पुणे विभागातील धरणांमध्ये ५२.९७ टक्के तर कोकण विभागात ५८.१३ टक्के पाणीसाठा आहे.
जायकवाडी धरण ६३ टक्क्यांवर
मराठवाड्यातील हजारो नागरिकांची तहान भागवणारे जायकवाडी धरण सध्या ६३ टक्क्यांवर आहे. गेल्यावर्षी जायकवाडीत याच तारखेला २४.४४ टक्के पाणी शिल्लक होते. पुण्यातील डिंभे धरण ४५.३६ टक्के, भाटघर ६१.५५ टक्के तर खडकवासला ६९ टक्क्यांवर आहे. मागील वर्षी शून्यावर असलेले उजनी धरण ४३.२९ टक्क्यांवर आहे, असे जलसंपदा विभागाने सांगितले. यासोबतच निम्न तेरणात सध्या ७४.०२ टक्के साठा आहे. गतवर्षी केवळ ५.५३ टक्के पाणी होते.