26.3 C
Latur
Tuesday, March 18, 2025
Homeमहाराष्ट्रघरीच थांबा, बाहेर पडू नको, पोलिस आयुक्तांचे आवाहन

घरीच थांबा, बाहेर पडू नको, पोलिस आयुक्तांचे आवाहन

नागपूर : औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी नागपुरात आज सकाळी मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर संध्याकाळी दोन गटांमध्ये धुमश्चक्री उडाली. नागपुरातील महाल परिसरात दोन्ही गट आमनेसामने आले आणि एकमेकांवर दगडफेक सुरू केली. त्यानंतर वाहनांची जाळपोळ सुरू करण्यात आली. हल्लेखोरांनी पोलिसांवरही दगडफेक केली. त्यात १० पेक्षा अधिक पोलिस जखमी झाले असून फायर ब्रिगेडचे चार जवानही जखमी झाले आहेत. या हल्ल्यामुळे नागपूरमध्ये तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं आहे. घराघरात जाऊन पोलिसांनी समाजकंटकांना पकडण्याचे काम सुरू केले आहे.

आज संध्याकाळी महाल परिसरात अचानक दोन गट आमनेसामने आले. दोन्हीकडून जोरदार दगडफेक करण्यात आली. वाहनांची जाळपोळ करण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पोलिस हल्लेखोरांना पांगवण्यासाठी आले असता पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांवरही दगडफेक करण्यात आली. त्यात ८ ते १० पोलिस जखमी झाले आहेत. तर फायर ब्रिगेडचे चार जवान जखमी झाले आहेत. मात्र, पोलिसांनी जीवाची पर्वा न करता लाठीमार करत, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत जमावाला पांगवले. तब्बल दीड तास ही धुमश्चक्री सुरू होती. मात्र, आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचें पोलिसांनी सांगितले. तसेच आतापर्यंत २० हून अधिक संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

दिसेल ती वाहने फोडली
समाजकंटकांनी यावेळी बेभान होऊन रस्त्यावरील दिसेल ती गाडी फोडण्यास सुरुवात केली. चारचाकी आणि दुचाकी वाहने पेटवण्यात आली. त्यानंतर काही लोकांनी जेसीबी वाहन पेटवून दिले. त्यामुळे आगीचा एकच भडका उडाल्याने लोकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. सध्या नागपूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

कोम्बिंग ऑपरेशन सुरू
या हल्ल्यानंतर पोलिसांनी महल परिसरात कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं आहे. पोलीस दगडफेक करणा-यांचा शोध घेत आहे. गल्लोगल्ली, घराघरात जाऊन समाजकंटकांची धरपकड करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी जाळपोळ झाली त्या परिसरात जाऊन पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. तसेच इमारतीत घुसूनही पोलिसांनी समाजकंटकांना अटक केली आहे.

अनेकांना ताब्यात घेतले
नागपूर पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. दगडफेक थांबली आहे. कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. आम्ही आरोपींना ताब्यात घेतोय. काही लोक बाहेरून आले होते. आम्ही त्यांची माहिती घेत आहोत. पण कायदा हातात घेतलेल्यांचा शोध घेत आहोत. अनेकांना आम्ही ताब्यातही घेतलं आहे, असं सांगतानाच कुणीही कायदा हातात घेऊ नये. तुम्ही घरीच थांबा. आम्ही फिल्डवर आहोत असे रवींद्र सिंघल यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR