36.4 C
Latur
Wednesday, April 30, 2025
Homeराष्ट्रीयभारतीय जवानांवरील गोळीबारात अतिरेक्यांनी वापरल्या स्टील बुलेट

भारतीय जवानांवरील गोळीबारात अतिरेक्यांनी वापरल्या स्टील बुलेट

श्रीनगर/नवी दिल्ली : काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील सुरनकोट येथे गुरुवारी लष्कराच्या ताफ्यावर चार अतिरेक्यांनी हल्ला केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. दबा धरून बसलेल्या अतिरेक्यांनी ताफ्यावर अमेरिकन एम-४ असॉल्ट रायफलीतून स्टील बुलेट झाडल्या होत्या. या बुलेट लष्करी वाहनांचे जाड लोखंडी थर भेदण्याच्या उद्देशाने झाडल्या होत्या. असे म्हटले जाते की, पाकिस्तानी हस्तकांकडून या रायफली अतिरेक्यांकडे आल्या. त्या अमेरिकी लष्कराने अफगाणिस्तानातून जाताना तेथेच सोडून दिल्या होत्या.

दरम्यान, शुक्रवारी भारतीय लष्कराने पाच चौरस किलोमीटर परिसरात शोधमोहीम राबवली. हेलिकॉप्टरद्वारेही शोध घेतला जात आहे. एनआयएचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. अतिरेकी लष्कराची शस्त्रे घेऊन पळाले आहेत. पूंछ हल्ल्यातील शहीद जवान गौतमकुमार उत्तराखंडच्या कोटद्वारचा राहणारा आहे. गौतमचे मार्च महिन्यात लग्न होणार होते. ८९ आर्म्ड रेजिमेंटचा गौतम गत आठवड्यात ड्यूटीवर परतला होता. अन्य शहीद जवानांमध्ये नायक वीरेंद्रसिंह, नायक करण कुमार, रायफलमॅन चंदन कुमार आणि एका जवानाचा समावेश आहे.

काश्मिरात अद्याप आत्मघातकी पथके
काश्मिरात आत्मघातकी पथके अद्यापही सक्रिय आहेत. पूंछमध्येही अतिरेक्यांनी रेकी करून रस्त्याची वळणे निवडली. अतिरेक्यांनी येथे कमीत कमी चार ते पाच दिवसांपर्यंत लपण्याचे ठिकाण तयार केले असावे. या भागात दाट जंगल आहे. शोधमोहिमेदरम्यान या अतिरेक्यांना आत्मघातकी पथके लपण्यासाठी जागाही देतात. अशा वेळी अतिरेक्यांना पकडताना अडचणी येतात. अमेरिकी रायफलींचा पाकिस्तानी हस्तकांशी असलेला संबंध स्पष्ट आहे. मात्र, एलओसीवर हवाई सुरक्षा वाढवावी लागेल. काश्मिरात हिवाळयामध्ये हल्ले वाढवण्याचा अतिरेक्यांचा पॅटर्न असतो. अनेक भागात बर्फवृष्टी होत असल्याने लपण्याची ठिकाणे वाढत आहेत. आता ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रे खाली पाडण्याचा धोकाही खूप वाढला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR