मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारातील नेत्रदीपक वाढीचा ट्रेंड आजही कायम आहे. शुक्रवारी शेअर बाजारात तेजी दिसून आली. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, दोन्ही बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने वाढीसह व्यवहार करण्यास सुरुवात केली. सेन्सेक्सने प्रथमच ७१,००० चा टप्पा ओलांडला आहे. आजच्या व्यवहारात, सेन्सेक्स २८९.९३ अंकांच्या (०.४१ टक्के) वाढीसह ७०,८०४.१३ च्या पातळीवर उघडला. तर निफ्टी १०४.७५ अंकांच्या (०.४९ टक्के) वाढीसह २१,२८७.४५ च्या पातळीवर उघडला.
बीएसईचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स शुक्रवारी सकाळी १०:३० च्या सुमारास ५६९.८८ अंकांनी उसळी घेऊन ७१,०८४.०८ वर पोहोचला. यासह निफ्टी २१३०० च्या वर नवीन विक्रमी पातळीवर व्यवहार करत आहे. शुक्रवारी सुरुवातीच्या व्यापारात गुंतवणूकदारांच्या भांडवलात २ लाख कोटी रुपयांची वाढ झाली कारण सेन्सेक्सने प्रथमच ७१,००० चा टप्पा ओलांडला. तसेच बीएसई लिस्टेड कंपन्यांच्या मार्केट कॅपने सुरुवातीच्या व्यापारात ३५७ लाख कोटी रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. याआधी, सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने प्रथमच ७०,००० चा टप्पा ओलांडला होता.