न्यूयॉर्क : एआयचा फुगा कधीही फुटू शकतो! अमेरिकेतली वाढते व्याजदर, अमेरिकेवर वाढणारे कर्ज, आखाती देशातील तणाव आणि अस्थिर जागतिक आर्थिक परिस्थितीमुळे देशातील शेअर बाजार तणावाखाली आहेत. जगभरातील शेअर बाजारावरही त्याचा परिणाम दिसत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे.
ब्रिजवॉटरचे संस्थापक आणि अब्जाधीश रे डॅलिओ यांनी शेअर बाजारांना इशारा दिला आहे की, एआयचा फुगा फुटण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेअर बाजारात मोठी मंदी येण्याचा धोक्याचा इशारा त्यांनी दिला आहे. शेअर बाजारातील सध्याच्या पार्श्वभूमीवर, विदेशी अब्जाधीश रे डॅलिओ यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) बाबत एक गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की क्लासिक एआय बबल फुटण्याच्या मार्गावर आहे. त्यांनी यासाठी अनेक कारणेही सांगितली.
अब्जाधीश रे डॅलिओ यांच्या मते, एआय बबल फुटण्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात केलेली वाढ. आता गुंतवणूकदारांना आपली मालमत्ता रोख रकमेत रूपांतरित करण्याची गरज भासत आहे. ते म्हणाले की, भारतीय गुंतवणूकदार परदेशातील घडामोडींवरही बारकाईने लक्ष ठेवत आहेत. २०२५ पासून भारतीय शेअर बाजार सर्वात कमकुवत कामगिरी करणा-या प्रमुख बाजारांपैकी एक आहे. ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार, सिंगापूरमधील फोर्ब्स ग्लोबल सीईओ कॉन्फरन्समध्ये बोलताना डॅलिओ म्हणाले की, एआयला वित्तपुरवठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले जात आहे आणि व्याजदर सतत वाढत असल्याने, हा फुगा आता फुटू शकतो. ब्रिजवॉटरचे संस्थापक म्हणाले, आपण चक्राच्या अशा टप्प्यात आहोत जो या संकटाच्या आधीचा आहे, पण आता त्याकडेच जात आहे.
युद्धामुळे चलनवाढीचा दबाव
एआयचा फुगा फुटण्याचा इशारा देताना त्यांनी काही आकडेवारी सादर केली. त्यांनी सांगितले की, आकडेवारीनुसार १०-वर्षांच्या उत्पन्नाचा दर ५.३६८ टक्क्यांपर्यंत वाढला आहे, जो २००२ नंतर प्रथमच इतका वाढला आहे. हा कल अनेक घटकांच्या एकत्रित परिणामामुळे प्रेरित आहे, ज्यात वाढता सरकारी कर्जाचा बोजा, व्यापारातील विखंडन, युद्धामुळे निर्माण झालेला चलनवाढीचा दबाव आणि एआय पायाभूत सुविधांशी संबंधित मोठ्या भांडवली गरजा यांचा समावेश आहे. हे सर्व घटक जागतिक बचतीची उपलब्धता कमी करत आहेत आणि समतोल वास्तविक व्याजदर वाढवत आहेत. त्यामुळे त्यांनी हा धोका व्यक्त करत इशारा दिला आहे.
ऑटोमेटेड आणि अल्गोरिदम ट्रेडिंगचे धोके
आजकाल जगभरातील ७०% पेक्षा जास्त ट्रेडिंग हे एआय आणि अल्गोरिदमद्वारे स्वयंचलित पद्धतीने केले जाते. जेव्हा बाजारात एखादी नकारात्मक बातमी येते, तेव्हा हे एआय अल्गोरिदम्स मानवी भावनांशिवाय अतिशय वेगाने शेअर्सची विक्री सुरू करतात. यामुळे बाजारातील घसरण एकाएकी प्रचंड वेगाने वाढते, ज्याला फ्लॅश क्रॅश म्हटले जाते.
सेबी पाऊल उचलणार
शेअर बाजारातील या एआयच्या वाढत्या धोक्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारताची नियमन संस्था सेबी लवकरच कठोर नियम लागू करणार आहे. बाजारात धोक्याची चिन्हे दिसताच एआय ट्रेडिंग यंत्रणा स्वयंचलितपणे बंद करण्याचे अधिकार याद्वारे आणले जाणार आहेत.
















