हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या हैदराबादमधील ज्युबली हिल्स येथील घरावर रविवारी (दि.२२) उस्मानिया विद्यापीठाच्या संयुक्त कृती समितीच्या (जेएसी) सदस्यांनी दगडफेक आणि टोमॅटो फेकले. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानिया विद्यापीठातील पदाधिका-यांनी अल्लू अर्जुन नेत्यांनी अभिनेत्याच्या घरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणातील मृत महिलेच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली. यानंतर उस्मानिया विद्यापीठाच्या संयुक्त कृती समितीच्या सदस्यांनी घरावर दगडफेक आणि टोमॅटो फेकले.
यावेळी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत उस्मानिया विद्यापीठाच्या संयुक्त कृती समितीच्या आठ सदस्यांना ताब्यात घेतले आणि त्यांना ज्युबली हिल्स पोलिस ठाण्यात नेण्यात आले. दरम्यान, अल्लू अर्जुनच्या घरात तोडफोडीचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये काही जण घराच्या कंपाऊंडमधील कुंड्या फोडल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, या घटनेवेळी अल्लू अर्जुन त्याच्या घरी
उपस्थित नव्हता, असे सांगण्यात येत आहे.
४ डिसेंबर २०२४ रोजी ‘पुष्पा २’ च्या प्रीमियरच्या वेळी अल्लू अर्जुन हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये गेला होता, तिथे त्याची एक झलक पाहण्यासाठी चेंगराचेंगरी झाली होती. या अपघातात रेवती नावाच्या महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा ९ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. तो अजूनही व्हेंटिलेटरवर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अल्लू अर्जुन, थिएटर आणि सुरक्षा एजन्सीविरुद्ध निर्दोष हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला पोलिसांनी १३ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता अटक केली होती. अटकेनंतर त्याला ४ वाजता स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अल्लूने अंतरिम जामिनासाठी तेलंगणा उच्च न्यायालयात अपील केले होते. सायंकाळी ५ वाजता त्याला ५० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. यादरम्यान, त्याने एक रात्र कारागृहात काढली होती.