जळगाव : जळगावमधून मोठी बातमी समोर येत आहे. मेहकरहून भुसावळकडे जाणा-या बसवर एकाने वरणगावनजिकच्या सातमोरी पुलाजवळ दगडफेक केली आहे. या घटनेत बसच्या काचा फुटल्या असून, एक पाच वर्षांची चिमुकली जखमी झाली आहे.
तसेच आरोपीने वाहकाला देखील मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून, संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र या दगडफेकीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बस क्रमांक एमएच ४० एन ९९४१ ही बस मेहकरवरून भुसावळला जात असताना आरोपी विशाल बोंडे हा महामार्ग क्रमांक सहावर आपल्या दुचाकीवर बसच्या पुढे आला, त्याने दुचाकी आडवी लावून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यावेळी चालक, वाहक त्याला समजावण्यासाठी गेले असताना त्याने बसवर दगडफेक सुरू केली. या दगडफेकीमध्ये बसच्या काचा फुटल्या आहेत. तसेच बसमधून प्रवास करणा-या एका चिमुकलीला दुखापत झाली आहे. देवांशी स्वप्नील सुलताने (वय वर्षे ५, रा. गुंजखेडा, ता. लोणार, जि. बुलडाणा) असे अपघातामध्ये जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे.
विशाल बोंडे याने वाहक पिंगळे यांना देखील मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी बसचे चालक योगेश सावळे यांच्या तक्रारीवरून बोंडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.