इंदापूर : मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट देणे ताबडतोब थांबवा, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी इंदापूर येथील सभेत केली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देऊ नका, आमची इतर कोणतीही मागणी नाही, असेही भुजबळ म्हणाले. मराठा समाजाकडे २० टक्के, आमच्याकडे ८० टक्के मते आहेत. ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण आहे. प्रत्येक जमातीला ब्रॅकेट आहे. ओबीसी समाजाला सरकारी नोक-या फक्त ९ टक्के मिळाल्यात. आधी २७ टक्के जागा भरा मग इतर गोष्टी करा, असे म्हणत भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीकास्त्र सोडले.
इंदापूर येथील ओबीसी एल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात जाती निहाय जनगणना झाली पाहिजे. त्यामध्ये अडचण काय आहे, बिहार करू शकते तर तुम्ही का जनगणना करीत नाही. मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट द्यायचे सुरु आहे ते थांबवा. न्यायमूर्ती शिंदे सगळीकडे जात आहेत आणि करून घेत आहेत. आमच्या २७ टक्क्यांतील आरक्षण दिले पाहिजे. पण ओबीसीमधून आरक्षण देता कामा नये, असे भुजबळ म्हणाले.
नेते मौन बाळगून
आरक्षणावर अनेक नेते बोलायला तयार नाहीत. कसली भीती वाटते आहे? मतांची भीती वाटते का? त्यांच्याकडे मते आहेत आमच्याकडे नाहीत का? त्यांची २० टक्के आणि ८० आमची आहेत. हर्षवर्धन पाटील, विजयंिसह पाटील तुम्हाला कुणबी सर्टीफिकेट पाहिजे आहेत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.