पुणे : वाहतूक नियमन करणा-या महिला पोलिस अधिका-यासह कर्मचा-यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान वाहतूक विभागाच्या विश्रामबाग कार्यालयात ही घटना घडली. याप्रकरणी संजय फकिरा साळवे याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. बुधवार चौकात ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई सुरू असताना हा प्रकार घडला.
अटकेत असलेला आरोपी दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा संशय आल्याने त्याला ब्रीद एनालायझर टेस्टसाठी विश्रामबाग कार्यालयात आणले गेले. त्यावेळी त्याने संबंधित पोलिसांशी वाद घालून त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. एपीआय जानकर सावंत यांच्यासोबत हा प्रकार घडला. सुदैवाने आरोपीच्या हातातला लायटर पेटू न शकल्याने पुढील दुर्घटना टळली.
आरोपीने ज्या महिला पोलिस अधिका-यावर पेट्रोल ओतले त्या महिला पोलिस अधिकारी शैलेजा स्वरूप जानकर यांनी त्यावेळी घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्या म्हणाल्या की आरोपीला याच चौकात पकडण्यात आले होते. तो फार गोंधळ घालत होता. ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह चेकिंग करताना आरोपीला पकडण्यात आले होते. पोलिस स्थानक जवळच असल्यामुळे त्याला चेकिंग करण्यासाठी तिथे नेण्यात आले. त्यावेळी एक पोलिस अधिकारी त्याचे चेकिंग करत होते. त्यावेळी त्याने थेट गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तेवढ्यात तो कार्यालयातून बाहेर गेला आणि पेट्रोलचा डबा घेऊन आला. चेकिंग करत असलेल्या पोलिसाच्या अंगावर तो पेट्रोल टाकू लागला. त्यावेळी त्याला थांबवण्यासाठी मी मध्ये पडले. त्याने माझ्याही अंगावर पेट्रोल टाकले. संध्याकाळी साधारणत: सातच्या दरम्यान हा प्रकार घडला.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपाली भुजबळ बोलताना म्हणाल्या की शुक्रवारी संध्याकाळी ट्रॅफिक ब्रँचकडून बुधवार चौकात कारवाई सुरू होती. त्यावेळी आरोपी दुचाकीवरून जात असताना पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला थांबवले. त्यावेळी आरोपी मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सर्वांना आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आणि पुढच्या कारवाईसाठी पोलिस स्थानकात आणले. त्यानंतर पोलिसांनी मशिनने त्याची अल्कोहल टेस्ट करण्यासाठी त्याला मशिनमध्ये फुंकर मारण्यास सांगितली. पण आरोपी टाळाटाळ करू लागला. आरोपीने पोलिस स्थानकात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला शांत करण्यासाठी थोडा वेळ थांबण्यासाठी सांगितले. तेवढ्या वेळात तो तिथून पळून गेला आणि एका छोट्या बाटलीत पेट्रोल आणि लायटर घेऊन आला. त्यानंतर जे कर्मचारी तपासणी करत होते त्यांच्यावर त्याने पेट्रोल ओतले आणि पेटवण्याचा प्रयत्न केला.