सेलू : सेलू शहरासह तालुका सोमवार दि. ५ मे रोजी दुपारी झालेल्या वादळी वा-यामुळे तालुक्यातील हिस्सी येथील एका शेतक-याच्या शेतात कडब्याच्या गंजीला आग लागली. तर राजा येथील काही गावक-यांच्या घरावरील पत्रे उडाली. तसेच खवणे पिंपरी येथील एका शेतक-याच्या शेतात उभे असलेले केळीचे पीक जोरदार वा-यामुळे जमीनदोस्त झाले आहे.
सेलूचे तहसीलदार शिवाजी मगर हे या तीनही गावातील नागरिकांशी संपर्कात असून हिस्सी येथील कडब्याच्या गंजिस लागलेली आग विझवण्याकरिता मानवत येथून अग्निशामक दलाची गाडी बोलावण्यात आली होती. तसेच राजा येथील अनेक घरांची पत्रे उडाली आहेत, मात्र त्यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते. खवणे पिंपरी येथील एका शेतक-याचे केळीचे पीक जमीनदोस्त झाले. वरील तीनही ठिकाणी झालेल्या नुकसानीचा पंचनामा मंगळवारी होणार असल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली.