22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeधाराशिवधाराशिव जिल्ह्यात तुफान वादळी वा-याचा हाहाकार

धाराशिव जिल्ह्यात तुफान वादळी वा-याचा हाहाकार

सांगवीत पत्र्यावरील दगड डोक्यात पडल्याने एकाचा बळी

धाराशिव : प्रतिनिधी
जिल्ह्यात मागील आठवड्यापासून तुफान वादळी वा-याने हाहाकार माजवला आहे. मोठमोठी झाडे उन्मळून पडली असून अनेकांच्या घरावरील पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे. धाराशिव तालुक्यातील सांगवी येथे तर रविवारी (दि.२६) रात्री १० वाजण्याच्या सुमारास तुफान वादळी वा-यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यामध्ये घरावरील पत्रे उचकटल्याने पत्र्यावरील दगड डोक्यात पडून हनुमंत कोळपे (वय ८०) या वृध्द शेतक-याचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे वादळी वा-याने याठिकाणी एकाचा बळी घेतला असून या घटनेमुळे सांगवी गावावर शोककळा पसरली आहे.

धाराशिव तालुक्यातील सांगवी, कामेगाव, लासोना, समुद्रवाणी परिसरात रविवारी रात्री तुफान वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावली. यामध्ये अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. मोठमोठी झाडे उन्मळून पडली. विद्युत ताराही तुटून पडल्यामुळे लाईट गेली. या वादळी वा-यामध्ये सांगवी येथील हनुमंत कोळपे यांच्या घरावरील पत्रे उचकटल्याने पर्त्यावरील दगड घरात बसलेले कोळपे यांच्या डोक्यात पडल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.

डोक्यात दगड पडल्यामुळे संपुर्ण रुममध्ये रक्तस्त्राव झाला होता. जिल्ह्यात मागील आठवड्यापासून तुफान वादळी वारे वाहत आहेत. यामध्ये विजा पडून अनेक जनावरेही दगावली आहेत. त्यातच आता या वादळी वा-यामुळे सांगवी गावातील शेतक-याचा बळी गेला आहे. वादळी वारे एवढे तुफान होते की, यामध्ये सांगवी, कामेगाव, राजुरी, लासोना, समुद्रवाणी या परिसरातील शेतातील जनावरांसाठी उभारलेले अख्खे शेकडच्या शेड वा-याने दोन ते तीन किलोमीटरपर्यंत जावून पडले आहेत. तसेच गावातील अनेकांच्या घरावरील पत्री उडाल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.

ही घटना कळताच रविवारी रात्री १२ ते १ वाजण्याच्या सुमारास खा. ओमप्रकाश राजनिंबाळकर, आ. कैलास पाटील यांनी सांगवी येथील घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. घाबरलेल्या नागरिकांना धीर देत प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी प्रशासनातील मंडळ अधिकारी कोळी, तलाठी निंबाळकर, ग्रामसेवक यांनी मध्यरात्रीच भेट देवून पंचनाम्याचे काम सुरु केले आहे. मयत हनुमंत कोळपे यांच्यावर सोमवारी (दि.२७) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR