24.3 C
Latur
Tuesday, June 25, 2024
Homeमहाराष्ट्रदहावीचा निकाल जाहीर, लातूर विभागाचा दबदबा कायम

दहावीचा निकाल जाहीर, लातूर विभागाचा दबदबा कायम

१२३ विद्यार्थांना मिळाले १०० टक्के गुण

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यंदा पहिल्यांदाच दहावीचा निकाल मे महिन्यात आला असून, यावेळी ९५.८१ टक्के लागला आहे. तर कोकण विभागाने निकालात बाजी मारली असून, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९९.०१ टक्के लागला. तर नागपूर विभागाचा निकाल सर्वांत कमी ९४.७३ टक्के लागला. यासोबतच लातूर विभागाने आपला पॅटर्न कायम राखत विभागातून १२३ विद्यांर्थांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी आज पत्रकार परिषेद घेऊन दहावीचा निकाल जाहीर केला. यावेळी गोसावी यांनी सांगितले की, नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेला एकूण १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. निकालात मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे. ९४.५६ टक्के मुले उत्तीर्ण झाली असून, ९७ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. गेल्यावर्षी ९३.८३ टक्के निकाल लागला होता. गेल्यावर्षी राज्यातील १०८ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले होते, असेही गोसावी म्हणाले.

‘‘यंदा परीक्षा चांगल्या वातावरणात पार पाडण्यासाठी राज्यात कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आले. त्यासाठी २७१ भरारी पथके स्थापन करण्यात आली होती, यात महिलांचीही विशेष पथके नियुक्त करण्यात आली होती. त्याशिवाय जिल्हा स्तरावर स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली होती. आठ माध्यमांत ही परीक्षा घेण्यात आली. प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण ऑनलाइन घेण्यात आल्याने निकाल लवकर जाहीर करण्यास मदत झाली, असे ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्ययक्ष शरद गोसावी यांनी सांगितले.

लातूर विभागाचा दबदबा कायम

शिक्षण क्षेत्रात लातूर पॅटर्न म्हणून ओळख निर्माण करून राज्यासह देशभरात आपली ओळख निर्माण करणा-या लातूर विभागाने यावेळीही दहावीच्या निकालात आपला दबदबा कायम ठेवला असून, १२३ विद्यार्थांना यावेळी शंभर टक्के गुण मिळाले आहेत. तर विभागाचा निकाल ९५.२७ टक्के इतका लागला आहे.

विभागनिहाय दहावीचा निकाल
कोकण – ९९.०१
कोल्हापूर – ९७.४५
पुणे – ९६.४४
मुंबई – ९५.८३
अमरावती – ९५.५८
नाशिक – ९५.२८
लातूर – ९५.२७
संभाजीनगर – ९५.१९
नागपुर – ९४.७३

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR