29.1 C
Latur
Saturday, July 6, 2024
Homeक्रीडाभारतीय संघ सुपर-८ साठी सज्ज

भारतीय संघ सुपर-८ साठी सज्ज

न्यूयॉर्क : सन २०१३ पासून भारतीय संघ आयसीसी ट्रॉफीच्या शोधात आहे. आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपविण्याची जबाबदारी रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघावर आहे. टीम इंडियाने सुपर-८ मध्ये स्थान मिळवले आहे. भारतीय संघाने विजयाची हॅटट्रिक मारून सुपर-८ चे तिकीट मिळवले. कॅनडाविरूद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने भारताच्या खात्यात सात गुण झाले. सुपर-८ मधील लढतींना सुरुवात होण्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माने विविध मुद्द्यांवर भाष्य केले. रोहित शर्मा म्हणाला की, खेळाडूंमध्ये चांगला उत्साह आहे आणि आम्हाला स्पर्धेचा दुसरा टप्पा शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने सुरू करायचा आहे. प्रत्येकजण आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे, कोणतीही कसर सोडत नाही.

बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हीडीओत रोहितने रणनीती सांगितली. रोहितने म्हटले की, वेस्ट इंडिजमध्ये सामने होत आहेत. वेळापत्रकाबद्दल काही समस्या असू शकतात. परंतु, आम्ही सर्वजण या परिस्थितीचा सामना करत आहोत. त्यामुळे आम्ही कोणतेही कारण सांगू शकत नाही. आम्हाला आमच्या कौशल्यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करायचे आहे, आमच्यासाठी सराव सत्र महत्त्वाचे आहे, जेणेकरून मैदानावर सर्वोत्तम खेळ सादर करता येईल. या मैदानावर आम्ही अनेक सामने खेळले आहेत, त्यामुळे संघातील सहकारी खेळाडूंना येथील परिस्थितीचा चांगला अनुभव आहे.

तसेच निकाल आमच्याच बाजूने लागावा यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू. सर्वांचे लक्ष आगामी सामन्यांवर आहे, आम्ही देखील चालू विश्वचषकातील दुस-या फेरीत खेळण्यासाठी आतुर आहोत, असेही भारतीय कर्णधार रोहित शर्माने सांगितले. भारताने आयर्लंड, पाकिस्तान आणि अमेरिकेचा साखळी फेरीत पराभव केला. दरम्यान, सुपर-८ मध्ये भारताचा सलामीचा सामना २० जून रोजी अफगाणिस्तानसोबत होणार आहे. यानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यात लढत होईल. हा सामना २२ जून रोजी खेळवला जाईल. तर भारत आणि ऑस्ट्रेलिया हा बहुचर्चित सामना २४ जूनला होईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR