पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाविरुद्ध निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. पुणे येथील कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शिरुर येथील उमेदवार पाडणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले. त्यानंतर अजित पवार गटाकडून शिरुरमधून कोण लढणार? या प्रश्नाची चर्चा सुरु झाली आणि भोसरीचे माजी आमदार विलास लांडे या तगड्या उमेदवाराचे नाव समोर आले आहे.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांच्या तक्रारीचा पाढा वाचला. अमोल कोल्हे निष्क्रिय खासदार आहे. शिरूर लोकसभेसाठी आता त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार देणार असल्याचे अजित पवार यांनी सोमवारी म्हटले. हा उमेदवार मी जिंकून आणणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर आता भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी आपली इच्छी जाहीरपणे व्यक्त केली.
पाच वर्षात एका खासदाराने शिरुर मतदार संघाकडे लक्ष दिले नाही. त्यांच्यामुळे हा मतदारसंघ दुर्लक्षित राहिला होता. या ठिकाणावरुन त्यांना निवडून आणण्यासाठी मी स्वत: जीवाचे रान केले होते. आता तेथे आपला असलेला उमेदवार निवडूनच आणणार, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.