ठाणे : प्रतिनिधी
शिवसेनेतील बंडानंतर ठाण्याचे खासदार राजन विचारेंनी उद्धव ठाकरेंची साथ न सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपने ठाण्यावर दावा सांगितला होता. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या जागेचा विषय प्रतिष्ठेचा केला. त्यासाठी त्यांनी कल्याणच्या जागेची घोषणा ताणून धरली. या दबावतंत्राला यश आले. ठाण्याची जागा शिंदेसेनेला सुटली. आता ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्केंना येथून उमेदवारी दिली. आता म्हस्के यांच्यासाठी शिंदेंनी पूर्ण ताकद लावली आहे. आता त्यांनी थेट माजी नगरसेवकांना कामाला लावले असून, मताधिक्क्यावरच उमेदवारीचा विचार केला जाईल, असे शिंदे यांनी म्हटले आहे.
ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेंची मोठी ताकद आहे. त्यामुळे म्हस्के यांच्यासाठी ठाण्यातील लीड महत्त्वाची आहे. म्हस्के यांच्या प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी शिंदेंनी काल रात्री साडे बाराच्या सुमारास ठाण्यात बैठक घेतली. ही मॅरेथॉन बैठक तब्बल साडेचार तास चालली. पहाटे पाच वाजता बैठक संपली. या बैठकीला आजी-माजी आमदार उपस्थित होते. प्रताप सरनाईक, गीता जैन, रविंद्र फाटक, नरेंद्र मेहता बैठकीला हजर होते. ठाणे, मिरा-भाईंदर महापालिका हद्दीतील भागांमधून म्हस्के यांना मताधिक्क्य मिळवून देण्यासाठी शिंदेंनी अतिशय सूक्ष्म स्तरावर नियोजन केले. ठाणे महापालिकेतील सेनेचे जवळपास सगळेच नगरसेवक शिंदेसेनेत आहेत. लोकसभेसाठी त्यांना विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीत तिकीट हवे असेल तर लोकसभेला तुमच्या प्रभागातून म्हस्केंना मताधिक्क्य द्यावे लागेल, अशा सूचना देण्यात आल्या. त्यामुळे शिंदेसेनेतील नगरसेवकांची पुढील टर्म लोकसभेतील लीडवर अवलंबून असेल.
नवी मुंबईतून नाईकांची मदत मिळणार का?
भाजपचे आमदार गणेश नाईक यांचे नवी मुंबईत वर्चस्व आहे. नवी मुंबई भाजप म्हणजे सबकुछ नाईक अशी स्थिती आहे. माजी खासदार संजीव नाईक लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. पण शिंदेंनी ठाण्याची जागा पदरात पाडून घेतली. त्यामुळे नाईक यांची संधी हुकली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी नाराजी वर्तवली. नाईक यांच्या भेटीला पोहोचलेल्या म्हस्के यांच्या समोरच कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. त्यामुळे नाईक यांच्याकडून म्हस्केंना किती मदत मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.