24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeसंपादकीयबोगद्यातील संघर्ष

बोगद्यातील संघर्ष

उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे निर्माणाधीन बोगद्यात १२ नोव्हेंबरपासून ४१ कामगार अडकले आहेत. १२ नोव्हेंबरला सकाळी हा बोगदा अचानक कोसळला. आत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी १६ नोव्हेंबर रोजी सकाळी अमेरिकन ऑगर मशिन बसवून बचावकार्य नव्याने सुरू करण्यात आले. बुधवारी संध्याकाळी उशिरा हवाई दलाच्या हर्क्युलस विमानाने हे यंत्र दिल्लीहून उत्तरकाशीला आणण्यात आले. कामगारांच्या बचावासाठी नॉर्वे आणि थायलंडच्या बचाव पथकाचाही सल्ला घेण्यात येत आहे. ढिगा-याची जाडी ४० ते ५० मीटर होती आता ती ७० मीटर झाली आहे. त्यामुळे बचावकार्याला वेळ लागत आहे.

केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह गुरुवारी अपघातस्थळी दाखल झाले. कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी अजून दोन ते तीन दिवस लागतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. बचाव कार्यात अडचणी येत असल्याने कामगारांच्या सुटकेसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ड्रिल मशिनने खोदकाम सुरू असताना शुक्रवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास अचानक मोठा आवाज झाला. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून बचाव अभियान थांबवण्यात आले. अमेरिकन बनावटीच्या ऑगर मशिनद्वारे २२ मीटरपर्यंत खोदकाम करून तयार केलेल्या रस्त्यात चार मीटर लांबीचे ६ पाईप टाकण्यात येणार होते. मात्र, पाचवा पाईप टाकत असताना मोठा आवाज झाल्याने बचाव अभियान थांबवावे लागले. कामगारांच्या सुटकेसाठी राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एनएचआयडीसीएल), एनडीआरएफ, आयटीबीपी, बीआरओ आणि राष्ट्रीय महामार्गावरील २०० हून अधिक लोकांचे पथक २४ तास कार्यरत आहे. उत्तराखंडच्या ब्रह्मखाल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिल्क्यारा ते दुंडलगाव दरम्यान बांधकाम सुरू असताना दहा दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या कामगारांचा जीवन-मरणाचा संघर्ष सुरू आहे. निर्माणाधीन बोगदा केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी चार धाम सडक परियोजनेचा भाग आहे. बोगद्याचे १०० मीटरचे बांधकाम शिल्लक असताना ऐन दिवाळीच्या दिवशी भूस्खलन झाले आणि ४१ कामगार अडकून पडले. तीन दिवसांत कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

परंतु १० दिवस उलटून गेले तरी या कामगारांचा आवाज बोगद्याच्या बाहेर आलेला नाही. कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी बोगद्यावरील टेकडीला उभा छेद देऊन ‘प्रवेश मार्ग’ तयार करण्याचे काम रविवारी सुरू करण्यात आले. हिमालय पर्वताची माती एकसमान नसल्यामुळे खोदकाम, पर्यायाने बचावकार्य आव्हानात्मक असल्याचे स्पष्ट झाले आहे. अडकलेल्या कामगारांना पुरेसे अन्न आणि इतर जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी रविवारी सकाळी ढिगा-यातून ४२ मीटरपर्यंत मोठ्या व्यासाच्या नलिका टाकण्यात आल्या. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दुर्घटनास्थळी जाऊन बचावकार्याचा आढावा घेतला. हिमालयातील मातीचा स्तर एकसमान नाही. काही ठिकाणी ती मऊ तर काही ठिकाणी कठीण आहे. त्यामुळे यंत्रांच्या साह्याने चालू असलेले बचावकार्य आव्हानात्मक आहे. खोदकाम करणारी ऑगर यंत्रे व्यवस्थित चालली तर अडकलेल्या कामगारांची सुटका दोन ते अडीच दिवसांत होऊ शकते असे गडकरी म्हणाले. ४१ कामगारांना वाचविण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जात आहेत, तोपर्यंत कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मनोबल टिकवून ठेवणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे असेही गडकरी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बोगद्यात अडकलेल्या कामगारांचे मनोधैर्य टिकवून ठेवण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान मोदी यांनी बचाव अभियानाचा आढावा घेण्यासाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. आठवडाभरात पंतप्रधानांनी तीन वेळा धामी यांच्यासोबत चर्चा केली आणि स्थितीची माहिती घेतली. हिमालय फोडून बांधकाम करताना सुरक्षित साधनांची गरज असते. अशा यंत्रणांच्या अभावामुळेच कामगारांची सुटका लांबणीवर पडल्याचे दिसून येते. त्यामुळे कामगारांच्या कुटुंबीयांचा आक्रोश आणि संतापाचा बांध फुटणे साहजिक आहे. अडकलेले कामगार १० दिवसांपासून तग धरून आहेत. त्यांना अधिक ऊर्जा मिळावी म्हणून सुकामेवा, मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या आणि मनोधैर्य खचू नये म्हणून अ‍ॅन्टीडीप्रेसंट औषधे पोहोचवली जात आहेत. सुटकेसाठी शक्य ते सर्व मानवी प्रयत्न केले जात आहेत हे खरे आहे परंतु इथे प्रश्न निर्माण होतो तो असा की, मानवी भौतिक सुखासाठी निसर्गावर अतिक्रमण करणे कितपत योग्य आहे? अथवा या अतिक्रमणाला कितपत मर्यादा हवी यावर गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. सर्वशक्तिमान निसर्गाशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्यास जबरदस्त चपराक मिळते हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. तरीसुद्धा माणूस त्याच त्याच चुका नित्यनेमाने करतो आहे.

चुकीचे फळ तर भोगावेच लागणार. कामगारांच्या कष्टामुळे पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण झाले हे खरे आहे. हे जाळे बांंधकामाचे असो वा शेतीभातीचे. कामगारांचे हात देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देतात आणि दुस-याचे जगणे सुखकर करतात. परंतु हेच हात जेव्हा संकटात सापडतात तेव्हा त्यांचा आवाज एखाद्या बोगद्यात अडकतो. निसर्गावर अतिक्रमण करण्याची एकही संधी मानवाने सोडलेली नाही. त्याबद्दल त्याला फळे भोगावी लागत आहेत. परंतु आपण काय चूक करीत आहोत ते त्याच्या लक्षातच येत नाही. उलट तो निसर्गक्रम अनियमित बनला आहे, प्रदूषण वाढत चालले आहे असे निसर्गालाच दोष देत राहतो. निसर्गाकडे बोट दाखवताना चार बोटे आपल्याकडे वळली आहेत हे त्याच्या लक्षातच येत नाही. भौतिक सुखाच्या लालसेपोटी तो स्वत:च्याच पायावर दगड मारून घेत आहे. हे त्याच्या जेव्हा लक्षात येईल तो सुदिन म्हणता येईल. आपण निसर्गाची लेकरे आहोत, त्यामुळे तुमची मस्ती, उनाडक्या तो सहन करेलही परंतु याचा जेव्हा अतिरेक होईल तेव्हा जबरदस्त चपराक बसणारच!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR