22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसंपादकीय विशेषसंघर्ष योद्धा हरपला....

संघर्ष योद्धा हरपला….

गर्जना थे, और हुंकार थे तुम, वज्र थे तुम और थे टंकार तुम।
धैर्य, साहस, शक्ति के आधार थे तुम, आंधियों में अनल बनकर तुम जले।।
चले तुम सामर्थ्य ले, संकल्प ले, किया हर संग्राम में रिपू का दलन।
भूलकर संघर्ष की सारी व्यथाऐं, लिखी तुमने शौर्य की नूतन कथाऐं।।
तुम चले तो रो पडी सारी दिशाऐं, तुम चले तो चली कितनी प्रार्थनाऐं।
विदा तुमको दे रहे धरती गगन , राष्ट्र के प्रहरी तुम्हें शत शत नमन।।
उपरोक्त ओळी ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाची सार्थपणे ओळख करून देतात असे ज्येष्ठ समाजवादी नेते, ध्येयवादी शिक्षण संस्थाचालक, एक संघर्षशील व्यक्तिमत्त्व, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. मनोहरराव एकनाथराव गोमारे यांचे बुधवारी पहाटे ठीक साडेचार वाजता वयाच्या ८६ व्या वर्षी दु:खद निधन झाले. या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा हा श्रद्धांजलीपर लेख…

संघर्ष आणि अ‍ॅड. मनोहरराव गोमारे हे जणू एक समीकरणच होते. लातूर तालुक्यातील बोरी या गावी एका सामान्य शेतकरी कुटुंबात मनोहरराव गोमारे यांचा दि. १९ जानेवारी १९३८ रोजी जन्म झाला. ते सहा महिन्यांचे असतानाच त्यांचे मातृछत्र हरवले. अर्थातच ते सहा महिन्यांचे असतानाच त्यांची संघर्षयात्रा सुरू झाली. त्यांचे अनुक्रमे सरकारी शाळा, बोरी, श्री मारवाडी राजस्थान विद्यालय, लातूर, उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद, मराठवाडा विद्यापीठ, पहाडे लॉ कॉलेज, औरंगाबाद या ठिकाणी एलएल. बी.पर्यंतचे शिक्षण झाले. महाविद्यालयीन जीवनात चांगल्या मित्रांच्या सहवासात राहून त्यांची पुस्तके वाचून त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. पुस्तकांचे वाचन मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे फुले, शाहू, आंबेडकरी विचारांनी त्यांचे मन आकर्षिले गेले. जयप्रकाश नारायण, डॉ. राम मनोहर लोहिया, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, मधू लिमये, मधू दंडवते, मृणालताई गोरे आदी समाजवादी नेत्यांचे विचार त्यांच्या वाचनात आले. शिक्षण संपल्यानंतर त्यांनी लातूर येथील न्यायालयात १९६३ पासून तत्कालीन सुप्रसिद्ध वकील अ‍ॅड. हरिश्चंद्रराव पाटील यांचे ज्युनियर म्हणून वकालत सुरुवात केली.
वकील हा राजकारणापासून अलिप्त राहू शकत नाही असे म्हणतात, नव्हे तर वकिली आणि राजकारण ही जुळी भावंडे आहेत अशी त्यांची धारणा होती. म्हणून उत्तरोत्तर या दोन्ही क्षेत्रांत त्यांच्या कार्याची गती वाढली. भाषेवर प्रभुत्व, कायद्याचा प्रचंड अभ्यास, व्यवसायाविषयीची निष्ठा, आपल्या अशिलाविषयीची प्रांजळ भावना या बळावर त्यांनी अनेक केसेस यशस्वीपणे लढल्या.

लातूर १९६७ ची विधानसभेची निवडणूक केशवराव सोनवणे (काँग्रेस) विरुद्ध डॉ. बापूसाहेब काळदाते (समाजवादी पक्ष) ही निवडणूक खूप गाजली. या निवडणुकीत बापूसाहेब काळदाते यांच्या गळ्यात विजयाची माळ घालण्यामध्ये अ‍ॅड. गोमारे यांचा मोलाचा वाटा होता. मला वाटतं ख-या अर्थाने त्यांच्या राजकारणाची सुरुवात या निवडणुकीमुळे झाली आणि समाजवादी पक्षातील एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, मधू लिमये, जॉर्ज फर्नांडिस, बाबा आढाव, भाई वैद्य, सदानंद वर्दे, पन्नालाल सुराणा या सर्व राष्ट्रीय नेत्यांशी अ‍ॅड. मनोहरराव गोमारे यांचे निकटचे संबंध आले. समाजवादी विचाराने भारावलेल्या गोमारे यांनी एक सत्यनिष्ठ, मूल्यनिष्ठ व तत्त्वनिष्ठ व्यक्ती म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली. दलित, शोषित, पीडित, वंचित लोकांचा आधार ते बनले. जेथे कुठे अन्याय होतो तेथे सातत्याने धावून जाण्याचा त्यांचा स्वभाव होता.

१९७२ साली लातूरमध्ये झालेल्या एसटी आंदोलनाची संपूर्णत: त्यांनी धुरा सांभाळली. त्यामध्ये त्यांच्या गुडघ्यास मोठी दुखापत झाली होती. त्यांनी १९६७ साली तत्कालीन उस्मानाबाद जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली व जिंकली. हे संघर्षशील व्यक्तिमत्त्व आणीबाणीच्या काळात उजळून निघाले. १९७५ साली आणीबाणीमध्ये त्यांना सश्रम कारावास भोगावा लागला. १९७७ साली भाई उद्धवराव पाटील यांना लातूर मतदारसंघातून निवडून आणण्यामध्ये गोमारे साहेब अग्रेसर होते. १९७८ साली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनता पक्षाच्या तिकिटावर शिवराज पाटील चाकूरकर यांच्या विरोधात अ‍ॅड. गोमारे यांनी शर्थीची झुंज दिली. परंतु त्यात त्यांचा पराभव झाला. यापुढे विधानसभेच्या १९८०, १९८४, १९८९ या निवडणुकांमध्येही विलासराव देशमुख यांच्या विरोधात त्यांनी लढत दिली. १९९१ सालची लोकसभेची निवडणूकही ते लढले. १९६७ ची जिल्हा परिषदेची निवडणूक वगळता एकाही निवडणुकीमध्ये त्यांना यश आले नाही. परंतु अपयशाने खचून जाऊन आपली निष्ठा आणि आपले तत्त्व यामध्ये कधीही त्यांनी तडजोड केली नाही हे मात्र खरे!

निवडणूक लढत असताना एक तत्त्वनिष्ठ विरोधक कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणून आपणास अ‍ॅड. मनोहराव गोमारे यांच्याकडे पाहता येईल. सत्ताधारी पक्षाचे उमेदवार सुद्धा त्यांच्याविषयी अत्यंत आदराची भाषा करत होते. निवडणूक संपली की विरोध संपला अशी त्यांची भावना होती. त्यामुळेच शरदचंद्रजी पवार, व्ही. पी. सिंग, शिवराज पाटील चाकूरकर, विलासराव देशमुख ते गोपीनाथराव मुंडे, नितीन गडकरी यांच्यापर्यंत अनेक सत्ताधारी व विरोधी पक्षातील राज्यस्तरीय व राष्ट्रीय नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. जनता पक्षाचे ते प्रदेश उपाध्यक्ष होते. पुढे त्यांनी मायावतींच्या बहुजन समाज पक्षात प्रवेश केला व नंतर मुलायमसिंग यांच्या समाजवादी पक्षात गेले. पण तेथे ते रमले नाहीत. बहुजन समाज पक्षात कांशीराम यांचा ध्येयवाद राहिला नाही आणि समाजवादी पक्षात डॉ. राम मनोहर लोहिया यांचा ध्येयवाद राहिला नाही. तत्त्वहीन राजकारण हे सामाजिक पाप असते हे कोणाच्याही लक्षात राहिले नाही त्यामुळे तेथूनही ते बाहेर पडले. विधिक्षेत्र आणि राजकीय क्षेत्रापुरतेच त्यांचे कार्य मर्यादित नव्हते तर लातूर एज्युकेशन सोसायटीचे (ज्ञानेश्वर विद्यालय) ते १९९० पासून अध्यक्ष होते. याशिवाय शासकीय बाल सुधारगृह समिती, अंधशाळा समिती, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते पदाधिकारी होते.

विशेषत: यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र आणि जिल्हा केंद्र, लातूरचे गेल्या दोन दशकांपासून सन्माननीय सदस्य म्हणून त्यांचे कार्य अविस्मरणीय आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानवर त्यांचा सहकारी म्हणून मला खूप काही शिकता आले. बाबासाहेब परांजपे फाऊंडेशनचे ते विद्यमान अध्यक्ष होते अशा अनेक शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, वैचारिक मंच आणि समित्यांचे पदाधिकारी असलेल्या गोमारे साहेबांच्या जीवनात त्यांचा मुलगा संजय व पुढे त्यांचा डॉक्टर होत असलेला नातू अवेळी जाण्याने कौटुंबिक अस्थिरता निर्माण झाली. परंतु याचा परिणाम त्यांनी त्यांच्या सामाजिक जीवनावर कधीही पडू दिला नाही. ध्येयवाद आणि वैचारिक निष्ठेशी बांधीलकी असणारे अ‍ॅड. मनोहरराव गोमारे नेहमीच सत्यनिष्ठ, मूल्यनिष्ठ आणि तत्त्वनिष्ठपणे राहिले. ‘सत्वपरीक्षा’ हे त्यांचे आत्मकथन असून ‘विचारधन’ हे त्यांचे दुसरे पुस्तक प्रकाशित आहे. सातत्यपूर्ण संघर्ष हा त्यांच्या जीवनाचा धागा राहिला तरीही ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ असे एकंदरीत जीवन सातत्याने जगणारे अ‍ॅड. मनोहरराव गोमारे हे देहाने नाही तर विचाराने आणि कार्याने आपल्या सोबत राहतील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

-विवेक सौताडेकर, मोबा.: ९४०३१ ०१७५१

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR