27.4 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeपरभणीविद्यार्थ्यांनी संशोधनातून स्टार्टअपची सुरुवात करावी

विद्यार्थ्यांनी संशोधनातून स्टार्टअपची सुरुवात करावी

कुलगुरू डॉ. चासकर

परभणी : जगभरात रोज नवनवीन शोध लागत आहेत. अशा शोधांच्या बळावर जग झपाटाने बदलत आहे. काळाची गरज लक्षात घेता विद्यार्थ्यांचे संशोधन स्पर्धेपुरते मर्यादित न राहता अविष्कार सारख्या संशोधन महोत्सवातून स्टार्टअपची सुरुवात व्हावी असे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि येथील श्री शिवाजी महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने दि.२२ रोजी परभणी येथे आयोजित विद्यापीठस्तरीय संशोधन महोत्सव अविष्कार-२५ च्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, प्रमुख उपस्थितीत महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख हेमंतराव जामकर, व्यवस्थापन परिषेदेचे सदस्य तथा महाविद्यालय विकास समितीचे सदस्य इंजि.नारायण चौधरी, सिनेट सदस्य डॉ.राजगोपाल कालानी, अशोक गुजराथी, डॉ. सुभाष विखे, विद्यापीठ समन्वयक डॉ.काशिनाथ बोगले, उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य डॉ. रोहिदास नितोंडे, समन्वयक डॉ. नानासाहेब शितोळे उपस्थित होते.

पुढे मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. चासकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी अशा संशोधन महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या संशोधनाला पेटंट मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. अशा पेटंटला विद्यापीठ प्रशासन संपूर्णपणे मदत करेल. विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांत सुसंवाद वाढवून विद्यार्थ्यांमधला वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करून त्यांना उत्पादनक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करावेत. समाजात वावरत असताना विद्यार्थ्यांनी आपल्या आजूबाजूला उपस्थित असलेल्या परिस्थितीकडे डोळे आणि कान उघडे ठेवून पहावे. जेणेकरून आपल्या संशोधनासाठी त्याची मदत होईल. अशा संशोधन महोत्सवातून विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती विकसित होण्यास चालना मिळते. श्री शिवाजी महाविद्यालय एक उत्कृष्ट महाविद्यालय तर आहेत परंतु ते शिक्षण क्षेत्रातले गुणवत्तापूर्ण नेतृत्व करीत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांनी केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके वितरित करण्यात आले. सदरील संशोधन महोत्सवात लातूर जिल्ह्यातील महाविद्यालयाने आपला दबदबा कायम ठेवत सर्वाधिक बक्षीस प्राप्त केले.

मानव्यविद्या, भाषा आणि कला शाखेत प्रथम श्रद्धा शर्मा, डाके ज्ञानेश्वर, चव्हाण अजय, वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेत सोहरा मावेश, अन्सारी मोहम्मद, ढवळे सिद्धांत, विज्ञान शाखेत राहेगावकर सुयश, रोडगे आरती, जयश्री स्वामी, कृषी आणि पशुसंवर्धन शाखेत जाधव तन्मय, बगळे प्रसाद, मोरे आरती, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शाखेत चव्हाण विशाल, पवार तेजस, देशमुख संभाजी, औषधनिर्माणशास्त्र शाखेत मोरे तनुजा, सुप्पेकर प्रतीक्षा, मनके महेश आदींनी प्रथम परितोषिके प्राप्त केली. सदरील संशोधन महोत्सवात विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील संशोधन प्रकल्प सादर केले होते. सदरील प्रकल्पांचे परीक्षण १६ परीक्षकांनी केले. सदरील विजेते स्पर्धक राज्यस्तरावर होणा-या संशोधन महोत्सवात सहभागी होतील. यशस्वीतेसाठी डॉ.सुरज आडे, डॉ. संतोष कोकीळ, डॉ. तुकाराम फिसफिसे, प्रा. शरद कदम, डॉ. गणेश चलींदरवार, डॉ. परिमल सुतवणे, डॉ. जी. बी. गुंडलेवाड, डॉ. चारुदत्त बेले, डॉ.जयंत बोबडे तसेच डॉ. प्रवीण जगताप आदींनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन डॉ.जयंत बोबडे तर आभार डॉ. तुकाराम फिसफिसे यांनी मानले. यावेळी परभणी, हिंगोली, नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR