20.9 C
Latur
Thursday, March 6, 2025
Homeसोलापूरएरंडीच्या बिया खाल्ल्याने विद्यार्थ्यांना त्रास

एरंडीच्या बिया खाल्ल्याने विद्यार्थ्यांना त्रास

मंगळवेढा : तालुक्यातील खुपसंगी येथील पटेल वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेतील २० विद्यार्थ्यांनी एरंडीच्या बिया खाल्ल्याने त्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने शिक्षकासह पालक वर्गात खळबळ उडाली. त्यांना तत्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले.

तालुक्यातील खुपसंगी येथील पटेल वस्ती येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी सकाळी लवकर शाळेला येत असतात. साधारणतः सकाळी नऊच्या दरम्यान हे विद्यार्थी शाळेत आले होते. त्यांनी शाळेलगत असलेल्या जंगली एरंडीच्या बिया खाल्ल्या आणि लगेच त्यांना उलटीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर शाळेत आलेल्या शिक्षकांनी याबाबत विद्यार्थ्यांकडे चौकशी केली असता, त्या विद्यार्थ्यांनी एरंडीच्या बिया खाल्ल्याचे सांगितले.

शिक्षकांनी लगेच पालकांना बोलावून घेतले व तत्काळ खासगी वाहनातून आंधळगाव येथील प्राथमिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यातील १४ विद्यार्थ्यांना अधिक त्रास होत असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आले.

सहा विद्यायांवर मंगळवेढ्यातील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सुलोचना जानकर यांनी दिली. घटनेची वार्ता तालुक्यात पसरल्यानंतर खळबळ उडाली. शाळेच्या परिसरात या परिसरातील पालक व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ही घटना समजताच आमदार समाधान आवताडे यांनी या प्रकरणी पालक व शैक्षणिक क्षेत्रातील अधिकाऱ्यांशी विचारपूस करून वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचार करण्याच्या सूचना दिल्या.

विद्यार्थ्यांवर तत्परतेने उपचार करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयातील डॉ. प्रवीण माने, डॉ. निखिल जोशी, डॉ. अनिल चौगुले, डॉ. स्नेहा घाडगे, डॉ. ऋतुजा गायकवाड, डॉ. अंकिता पवार, डॉ. पूजा बनसोडे, सुवर्णा सगरे, स्वरा काशीद, तेजश्री मेटकरी, सारिका कोळेकर, काजल धायगुडे, शिल्पा भोसले, बाबासाहेब शिवशरण, सतीश व्हनाटे यांनी प्रयत्न केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR