जिंतूर : शहरातील विद्या व्हॅली इंग्रजी शाळेची दहा दिवसीय सहल संपन्न झाली. या सहली दरम्यान विद्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक, भौगोलिक, वैज्ञानिक स्थळांना भेटी देऊन त्यांच्या ज्ञानात भर टाकली. शाळेच्या संस्थापिका अध्यक्षा प्रिया देशमुख, मुख्याध्यापिका रजिया पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर प्रत्यक्ष नैसर्गिक अनुभव यावा यासाठी या सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
यावर्षी शैक्षणिक सहल २१ ते ३० नोव्हेंबर असे दहा दिवस नेण्यात आली. या सहलीत विद्यार्थ्यांनी ईस्त्रो बेंगलोर व हिंदुस्तान अॅरोनॉटिक्स लिमिटेड या देशाच्या स्वायत्त संस्थांना भेट देऊन विद्यार्थ्यांमध्ये देश प्रेम रुजविण्यात आले. तसेच भारताचे महान वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे हाऊस ऑफ कलाम या घराला भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांनी चार धामपैकी एक धाम रामेश्वरम या ठिकाणी देखील भेट दिली.
तसेच भारताच्या दोन्ही बाजूंनी असणा-या अरब सागर व हिंद महासागर ज्या ठिकाणी एकत्र येतात ते ठिकाण म्हणजे धनुष कोडी येथेही भेट दिली. रामसेतूला, कन्याकुमारी, स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियलला, मीनाक्षी मंदिर मदुराई याठिकाणी भेट देवून माहिती करून घेतली. भौगोलिक स्थळांमध्ये विद्यार्थ्यांनी तामिळनाडूमधील प्रसिध्द हिल स्टेशन कोडे कॅनल या ठिकाणी भेट देऊन निसर्गाचार मनसोक्त आनंद लुटला. दि.३० नोव्हेंबर रोजी सहल परत आली. या सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी ४ हजार ४०० किलोमीटरचा प्रवास केला आहे.