बंगळुरु : दलित विद्यार्थ्यांना शौच टाकी स्वच्छ करायला लावल्याप्रकरणी शाळेचे मुख्याधापक आणि एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. कर्नाटकमधील कोलारच्या मोरारजी देसाई शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली.
शाळा प्रशासनाकडून दलित विद्यार्थ्यांना शाळेतील शौच टाकी साफ करण्यास लावल्याचा एक व्हीडीओ समोर आला होता. त्यानंतर मुख्याध्यापक आणि एका शिक्षकाला अटक करण्यात आली. तसेच शाळेतील चार कंत्राटी कर्मचा-यांवर कारवाई करण्यात आली आहे. याच शाळेतील आणखी एक व्हीडीओ समोर आला. ज्यात विद्यार्थ्यांना जड स्कूलबँग पाठीवर ठेवून रांगायला लावले जात आहे. मोरारजी देसाई शाळेत एकूण २४३ विद्यार्थी आहेत. यात १९ मुलींचा देखील समावेश आहे. सर्व विद्यार्थी ६ वी ते ९ वीच्या वर्गातील आहेत.
आरोपांनुसार चार विद्यार्थ्यांना शौच टाकीमध्ये उतरून हाताने टाकी साफ करण्याची शिक्षा सुनावण्यात आली होती. हाताने नाली किंवा टाकीची स्वच्छता करण्यावर भारतात तीन दशकांपासून बंदी आहे. असे असले तरी आजही अशाप्रकारची सफाई देशात पाहायला मिळते. टाकीमध्ये उतरल्याने श्वास गुदमरुन देशात अनेक कामगारांचा मृत्यू झाला. कर्नाटकमध्ये विद्यार्थ्यांना अशी शिक्षा देण्यात आल्याने त्यांचा जीव धोक्यात टाकण्यात आल्याचे स्पष्ट आहे. तसेच समाजाची मानसिकता अद्याप बदलली नाही याचे हे निदर्शक आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
सदर घटनेचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामया यांनी याप्रकरणी दखल घेतली. त्यानंतर मुख्याध्यापक आणि शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांना सेवेतून निलंबन करण्यात आले आहेत. याप्रकरणी अधिक तपास केला जाणार आहे.