बीड : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची आज शनिवारी (ता. २०) अंतरवाली सराटी ते मुंबई या निघणा-या दिंडीचे स्वागत करण्यासाठी त्यांची मातृभूमी सज्ज झाली आहे. प्रशासनानेही आरोग्य व कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जय्यत तयारी केली आहे.
शनिवारी या पायी दिंडीमुळे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाडळशिंगी (ता. गेवराई) ते शहागड दरम्यान रस्त्याच्या एकाच बाजूने वाहतूक सुरू असेल. जरांगे पाटलांसाठी बीडच्या मराठा समन्वयकांनी आधुनिक व्हॅनिटी व्हॅनची सोय केली आहे.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षणाच्या मागणीचे आंदोलन करणा-या मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या महिन्यात बीडला अंतिम इशारा सभा घेऊन २० तारखेला मुंबईला उपोषणासाठी समाजासह रवाना होण्याची घोषणा केली होती. अंतरवाली सराटी येथून निघणारी पायी दिंडी सहा दिवसांनी मुंबईला पोचणार आहे. पहिल्या दिवशीच ही पायी दिंडी मनोज जरांगे पाटलांचा स्वजिल्हा व मातृभूमीत मुक्कामी असणार आहे. सकाळी आठ वाजता जिल्हाभरातील समाजबांधव अंतरवाली सराटीकडे रवाना होतील. दिंडीचे दुपारचे जेवण कोळगाव येथे असेल. त्यानंतर ही दिंडी मातोरी येथे मुक्कामी असेल.
उपोषण पायी दिंडी अंतरवाली सराटीकडून शहागडहून गेवराई, पाडळशिंगी या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाने रस्त्याच्या पश्चिम दिशेने (बीडकडून शहागडकडे वाहने जाणा-या) येणार आहे. रस्त्याच्या पूर्व बाजूने (शहागडकडून बीडकडे वाहने येणा-या दिशेने) येणारी आणि जाणारी दोन्ही वाहनांची वाहतूक असेल. दिंडी पाडळशिंगीच्या पुढे कल्याण-विशाखापट्टणम रस्त्यावर देखील वाहतूक याच पद्धतीने असणार आहे.
मुक्कामाच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषण पायी दिंडीत मोठा जनसमुदाय असणार आहे. बीड हा त्यांचा स्वजिल्हा असल्याने जिल्ह्यातून देखील मोठा प्रतिसाद आहे. त्यामुळे पोलिस दलाने देखील मोठा बंदोबस्त ठेवला आहे. एक अपर पोलिस अधीक्षकांसह दोन उपविभागीय पोलिस अधिकारी व २५ अधिकारी तसेच ११५ पोलिस कर्मचारी आणि राज्य राखीव दलाची एक तुकडी तैनात असणार आहे. जिल्ह्याच्या हद्दीत रस्त्यांवर तसेच कोळगावला दुपारचे जेवण व रात्री मातोरीला मुक्कामाच्या ठिकाणी हा बंदोबस्त असेल. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी संपर्क साधून असल्याचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर म्हणाले. या पायी आंदोलनादरम्यान कुणीही कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणू नये, असे आवाहन त्यांनी केले.