नवी दिल्ली : प्रसिद्ध लेखिका सुधा मुर्ती यांची राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर पोस्ट करत याची माहिती दिली. सुधा मुर्ती यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत महिला दिनी मोदींनी त्यांना या नियुक्तीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत याची माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, भारताच्या राष्ट्रपतींनी सुधा मूर्ती यांचे नामांकन राज्यसभेसाठी केल्याने मला आनंद होत आहे. सुधा मूर्ती यांचे सामाजिक कार्य, शिक्षण यांसह विविध क्षेत्रात योगदान मोठे आणि प्रेरणादायी आहे. राज्यसभेत मूर्ती यांची उपस्थिती असणे ही आमच्या ‘नारी शक्ती’चा एक शक्तिशाली पुरावा आहे. त्यांचा संसदेतील सहभाग हा आपल्या देशाचे नशीब घडवण्यात असलेले महिलांच्या सामर्थ्याचे उदाहरण आहे. त्यांना संसदीय कार्यकाळासाठी शुभेच्छा.
सुधा मूर्ती या लेखिका तर आहेतच, पण त्या इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा देखील आहेत. इन्फोसिसच्या सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी आहेत. सन २००६ मध्ये त्यांना सामाजिक कार्यासाठी पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे. त्या मूळच्या कर्नाटकातील शिगगाव इथल्या आहेत. आयआयएससीमधून त्यांनी एमईपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांनी आजवर २० विविध विषयांची पुस्तके लिहिली आहेत.