पुणे : प्रतिनिधी
राज्यातील उसाचा गाळप हंगाम सुरू झाला असून आज अखेर सहकारी आणि खासगी मिळून १४७ साखर कारखाने सुरू झाले आहेत तर ८५ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले असून साखर उतारा ७.४ टक्के मिळाला आहे.
राज्यातील १९३ साखर कारखान्यांना गाळप परवाना देण्यात आला आहे. त्यामध्ये ९४ सहकारी आणि ९८ खासगी कारखाने आहेत. यावर्षीच्या हंगामात साधारणपणे साखर उत्पादन १३० लाख टन होणे शक्य असून त्यातील अंदाजे १२ लाख टन इथेनोलकडे वळविण्यात येणे शक्य आहे. यावर्षी एकूणच पावसाचे प्रमाण खूप राहिले त्यातही मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक झाले त्याचा एकूणच शेतीवर आणि उस पिकावर परिणाम झाला. त्यामुळे यंदाच्या हंगामात गाळपासाठी अंदाजे १२०० लाख टन उसाची उपलब्धता राहील असा अंदाज आहे.
राज्यात १ नोव्हेंबर पासून गाळप हंगामास सुरुवात झाली असून त्यामध्ये ७७ सहकारी आणि ७० खासगी कारखान्यांचा समावेश आहे. सर्वाधिक कारखाने कोल्हापूर जिल्ह्यात सुरू झाले आहेत.आजवर ११७ .२७ लाख मे टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे अशी माहिती सांगण्यात आली.
कारखाने वाढणे गरजेचे
उसाची उपलब्धता लक्षात घेता यावेळी राज्यात कारखान्यांची संख्या वाढणे शक्य आहे. यावर्षीच्या हंगामात १९३ कारखान्यांना परवाना दिला आहे तर २१ कारखान्याचे प्रस्ताव प्रलंबित आहेत गेल्या वर्षीच्या हंगामात राज्यातील ३८ साखर कारखान्यांनी एफ आर पी ची रक्कम दिली नसल्याचे स्पष्ट झाले असून संबंधित साखर कारखान्यांना नोटीस देण्यात आली आहे.

