इस्लामाबाद : पाकिस्तानच्या बलूचिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेस ट्रेन अपहरणानंतर आता खैबर पख्तूनख्वा भागातील पाकिस्तानी लष्कराच्या तळावर आत्मघातकी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात बरेच लोक मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे. आत्मघातकी हल्लेखोराने पाकिस्तानी सैन्याच्या तळावर जात स्वत:ला उडवून घेतले आहे.
खैबर पख्तूनख्वाच्या टँक जिल्ह्यातील जंडोला मिलिट्री कॅम्पवर हा हल्ला झाला. या हल्ल्यामागे अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेवर सक्रीय दहशतवादी संघटना तहरीक ए तालिबान पाकिस्तान यांचा हात असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानी आऊटलेट जियो न्यूजनुसार, दक्षिण वजीरिस्तान जिल्ह्यातील फ्रेटियर कॉर्प्सच्या शिबिराजवळ झालेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने ८ ते ९ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जंडोला इथे एक जोरदार स्फोटाचा आवाज ऐकायला आला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. दहशतवाद्यांनी जंडोला चेकपोस्टवर हल्ल्याचा प्रयत्न केला परंतु पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना रोखले. मात्र एका आत्मघातकी हल्लेखोराने कॅम्पजवळ वाहन घुसवून स्फोट घडवल्याचे पोलिस अधिका-यांनी मीडियाला सांगितले.
ट्रेन अपहरणानंतर घडली घटना
११ मार्च रोजी बलूच लिबरेशन आर्मीच्या बंडखोरांनी बोलन घाटात क्वेटाहून पेशावरला जाणा-या जाफर एक्सप्रेस ट्रेनवर हल्ला करून ती हायजॅक केली. या ट्रेनमध्ये २०० सुरक्षा जवान आणि ४५० हून अधिक प्रवासी होते. पाकिस्तानी सैन्याने अथक प्रयत्नानंतर २०० प्रवाशांना सोडण्यात आले. ५० बंडखोरांना ठार केले. मात्र १५० हून अधिक पाकिस्तानी सैनिक आमच्या ताब्यातच आहेत असा दावा बीएलएने केला आहे.
पाकिस्तानचा तालिबानवर आरोप
दरम्यान, जाफर एक्स्प्रेस ट्रेन हायजॅक मागे पाकिस्तानने अफगाणिस्तानला जबाबदार धरलं आहे. अपहरणाच्या वेळी बलुच लिबरेशन आर्मीचे बंडखोर अफगाणिस्तानात बसलेल्या त्यांच्या प्रमुखांच्या संपर्कात होते असा दावा पाकिस्तानी परराष्ट्र कार्यालयाने एक निवेदन जारी करून केला आहे. यावर तालिबानने पलटवार केला. पाकिस्तानने बेजबाबदार वक्तव्य करण्याऐवजी आपल्या सुरक्षा आणि अंतर्गत समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे तालिबानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते अब्दुल काहार बल्खी यांनी रोखठोकपणे सुनावले.