मुंबई : पोलिस दलातील शिपायाने नागपाडा पोलिस रुग्णालयाच्या प्रसाधनगृहाच्या खिडकीतून उडी टाकत जीव दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कैलास गवळी असे या पोलिस शिपायाचे नाव आहे.
दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. गवळी यांची माहिम पोलिस ठाण्यातून सशस्त्र पोलिस दल ३ वरळी येथे बदली दाखवण्यात आली होती. मात्र गवळी हे ८९ दिवस गैरहजर असल्याने त्यांना नागपाडा पोलिस रुग्णालय येथून फिट फॉर सर्टिफिकेट आणण्यास सांगितले होते.
त्यावेळी गवळी यांना रुग्णालयातील डॉक्टरांनी अॅडमिट करून घेतले. १४ जानेवारी रोजी गवळी नैसर्गिक विधीसाठी गेले असताना बाथरूमच्या खिडकीतून त्यांनी उडी टाकली. यात गवळी हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. गवळी यांना तातडीने जवळील जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता. उपचारादरम्यान गवळी यांचा मृत्यू झाला.