मुंबई : मुंबईतील वरळीत धक्कादायक घटना घडली आहे. प्रेयसीसोबत भांडण झाल्यानंतर पोलीस शिपायाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले आहे. प्रेयसीला मेसेज आणि फोटो पाठवून त्यानं हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंद्रजित साळुंखे (वय २७) असे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. तो एलए विभाग १ मध्ये कार्यरत होता. रविवारी रात्री वरळीच्या जलतरण तलावाजवळील लोखंडी ग्रीलला गळफास घेऊन त्याने आपली जीवनयात्रा संपवली आहे. प्रेयसीसोबत भांडण झाल्याने त्याने हे धक्कादायक कृत्य केले आहे.
इंद्रजितचे त्याच्या प्रेयसीसोबत भांडण झालेले होते. त्यानंतर त्याने तिला दादरला सोडले. तेथून तो वरळीला आला. तेथून त्याने प्रेयसीला आत्महत्या करत असल्याचा मेसेज आणि फोटो पाठवला. त्यानंतर त्याने हे पाऊल उचलले. या घटनेची नोंद वरळी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.