कोल्हापूर : बेपत्ता असलेल्या अभियंत्याचा मृतदेह काल (मंगळवार) रंकाळा परिसरातील इराणी खणीत सापडला. अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढला. शिवम अनिल सावंत (वय २६, संभाजीनगर) असे त्याचे नाव आहे.
वडिलांच्या निधनानंतर आईने कष्टाने त्याला शिकविले. त्याला मेकॅनिकल अभियंता केले, मात्र मनासारखी नोकरी मिळत नाही म्हणून त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे. त्याच्या मागे आई, आजी, भाऊ, वहिनी, बहीण असा परिवार आहे. सोमवारपासून तो बेपत्ता असल्याची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात आहे.
पोलिसांनी सांगितले की, संभाजीनगर परिसरात शिवम हा कुटुंबीयांसमवेत राहत होता. वडिलांचे दहा वर्षांपूर्वी निधन झाल्यानंतर आईच त्याचे छत्र बनली. त्यानंतर शिवमने मेकॅनिकल अभियंता म्हणून पदवी घेतली. त्यानंतर खासगी नोकरी करीत त्याने कुटुंबीयांना आर्थिक हातभार लावला; मात्र त्याला अपेक्षेप्रमाणे नोकरी पाहिजे होती. ती मिळत नसल्यामुळे तो निराश होता. काही महिन्यांपासून तो दुस-या नोकरीच्या शोधात होता.
सोमवारपासून तो घरातून कोणालाही न सांगता निघून गेला होता. त्याचा शोध सुरू होता. दरम्यान, काल सकाळी इराणी खणीत मृतदेह असल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस घटनास्थळी पोचले. तेथे त्यांना तरुणाचा मृतदेह तरंगताना दिसला. अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढला.