24.6 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeमहाराष्ट्रकुटुंबातील चौघाची आत्महत्या?

कुटुंबातील चौघाची आत्महत्या?

नागपूर : प्रतिनिधी
एकाच कुटुंबातील चार व्यक्तींनी आत्महत्या करत आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील मोवाड गावात हा प्रकार घडल्याने प्रचंड खळबळ माजली आहे.

मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा समावेश असून त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. या घटनेबद्दल समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करत मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवले आहेत. अकस्मात घडलेल्या या घटनेमुळे त्या कुटुंबियांच्या नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत.

या प्रकरणाबाबत पोलिसांकडून जी माहिती मिळाली त्यानुसार, नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील मोवाड गावात धक्कादायक घटना घडली आहे. एकाच घरातील चौघा जणांचे मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ माजली आहे. त्यामध्ये पती, पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. विजय पचोरी (वय ६८), त्यांची पत्नी मालाबाई पचोरी (वय ५५), मुलगा दीपक पचोरी (वय ३८) व गणेश पचोरी (वय ३८) अशी मृतांची नावे आहेत. कुटुंबातील या सर्वांनी सामूहिक आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. मात्र यामुळे मोवाड गावात भीतीचे वातावरण आहे.

प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे चार मृतदेहांपैकी तीन मृतदेहांचे हात पाठीमागे बांधून लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. तसेच प्रकरणातील वडिलांनीच तिघांच्या हत्येनंतर स्वत: आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच नागपूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच फॉरेन्सिकची टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR