सोलापूर : पोलिसात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी १० लाख रुपये द्या, अन्यथा तुम्हाला जेलमध्ये टाकतो, अशी धमकी दिल्याने या त्रासाला कंटाळून आपले पती मुञ्जमील अब्दुल सत्तार नाईकवाडी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार पत्नी मीनाज मुञ्जमील नाईकवाडी यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात दिली आहे.
ही घटना ब्रह्मदेव नगरात घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी निलोफर अस्लम नाईकवाडी, जाकीर शेख, मुजाहिद शेख, शाहनवाज, नुरोद्दीन मुल्ला, निलोफरचे आजोबा शफी, आई (सर्व रा. सिद्धेश्वर नगर, नई जिंदगी, सोलापूर) यांच्याविरुद्ध भा.दं. वि. ३०६ अन्वये गुन्हा नोंदला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादीची जाऊ निलोफर हिने महिला तक्रार निवारण केंद्रात फिर्यादीसह, पती, नणंद, नणंदेचे पती समीर जमादार, तिचे पती महेबूब जमादार यांच्याविरुद्ध खोटी तक्रार दिली होती. यानंतर वरील आरोपींनी फिर्यादीच्या पतीकडून १० लाख रुपये दे, तुमच्याविरुद्धची तक्रार मागे घेतो, नाहीतर जेलमध्ये घालतो अशी धमकी दिली. या त्रासाला कंटातून आपल्या पतीने रविवारी राहत्या घरी लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास सपोनि नामदे करीत आहेत.