अकोला : एप्रिल महिना पुढे सरकतो तसा सूर्याचा प्रकोपही वाढायला लागला असून विदर्भावर हा कोप अधिकच दिसून आला आहे. उन्हाच्या झळा अधिक तीव्र होत आहेत. सोमवार दि. ७ एप्रिल रोजी अकोल्याचे कमाल तापमान ४४.२ अंशावर पोहचले, जे राज्यात सर्वाधिक होते.
विदर्भातील इतर सर्व जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली असून ८ व ९ एप्रिल या पुढच्या दोन दिवसांत उष्ण लाटांचा सामना करावा लागेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. अकोल्यात सोमवारी एका अंशाची वाढ होत तापमान ४४.२ अंशावर पोहचले, जे सरासरीपेक्षा ४ अंशाने अधिक आहे. त्या खालोखाल चंद्रपूर व अमरावतीत ४३.६ अंशाची नोंद झाली.
ब्रम्हपुरीचा पारा ४३.८ अंशावर गेला. दुसरीकडे नागपुरात अंशत: वाढ होत पारा ४२.४ अंशावर पोहचला. वर्धा, यवतमाळातही तापमान ४२ अंशावर होते. गडचिरोली ४१ व गोंदिया ४० अंश नोंदविण्यात आले. सर्वच जिल्ह्यात तापमान सरासरीपेक्षा २ ते ४ अंशाने अधिक चढले आहे. रात्रीच्या तापमानातही किंचित वाढ नोंदविण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार बदलत्या वातावरणीय स्थितीमुळे मध्य भारत, उत्तर-पश्चिम राज्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस कमाल तापमानात २ ते ४ अंशाची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यातही ८ व ९ एप्रिल रोजी विदर्भात तापमान वाढून उष्ण लाटांच्या स्थितीचा सामना करावा लागेल. सध्या गुजरातचे सौराष्ट्र, कच्छ, पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, दिल्ली व मध्य प्रदेशातही उष्ण लाटांची स्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर वातावरणात पुन्हा बदल होत ढगाळ वातावरण व पुन्हा अवकाळी पावसाची स्थिती निर्माण होईल असा अंदाज आहे.