नवी दिल्ली : पाकिस्तानची आयएसआय भारतात अशांतता निर्माण करण्यासाठी आता भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये जातीयवादी वातावरणाला चिथावणी देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी पाकिस्तानमधून तस्करीद्वारे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची मोठी खेप जम्मू-काश्मीर, पंजाबद्वारे ईशान्येडील राज्यांत पोहोचवली जात आहे. त्यासाठी बिहार राज्याचा वापर एक ट्रान्झिट रुट व तस्करांसाठी शस्त्रास्त्रांचा साठा करण्यासाठी केला जात आहे. सूत्रानुसार या संबंधात अलीकडेच भारताच्या तपास संस्थेला काही इनपुट मिळाले आहेत. ते गृह मंत्रालय व भारताच्या इतर तपास संस्थांना पाठवण्यात आले.
या गुप्त माहितीच्या आधारे गेल्या काही दिवसांत एनआयएने शस्त्र तस्कर ५ राज्यांत दडून बसल्याचे आणि त्यांच्या ५ संशयित अड्डयांवर छापेमारी केली. तेथे शस्त्रे तसेच रोख रक्कमही जप्त करण्यात आली होती. तस्करीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शस्त्रे पोहोचवत आहेत. सूत्रानुसार गुप्त माहितीनुसार पाकिस्तानातून तस्करीद्वारे येणारी शस्त्रास्त्रे काश्मीरहून पंजाब-हरियाणा व उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये येतात. पुढे बिहारच्या १२ जिल्ह्यांत वेगवेगळ्या ठिकाणी जमा केली जातात. नंतर ती विकली जातात. तस्कर बिहारला हॉल्ट कम ट्रान्झिट रूटसाठी वापरू लागले आहेत. मागणीनुसार या शस्त्रांचा पुरवठा नागालँड, मणिपूर व ईशान्येकडील राज्यांत केला जातो. काही महिन्यांपूर्वी नागालँडमध्ये जप्त एके-४७ देखील बिहारमधून विकली गेली होती. एनआयएने केलेल्या तपासात बिहारमध्ये तस्करीचे काम करणा-या १२ संशयितांची धरपकड केली.
मणिपूर हिंसाचारात शस्त्रांचा वापर?
पाकिस्तानातील व भारतातील काही शस्त्र तस्करांत डार्क वेबवरील झालेल्या संवादाला गुप्तचर संस्थेने इंटरसेप्ट केले होते. त्यावरून ईशान्येकडील राज्यांतील वातावरण खराब करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बेकायदा शस्त्रे खरेदी केली जात आहेत. या शस्त्रांचे पैसे बिटकॉइनने दिले गेले. तपास संस्था असे व्यवहार झालेल्या खात्यांची चौकशी करत आहेत. एनआयए शस्त्र तस्करी टोळीची धरपकड करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी सर्व पातळ्यांवर तपास केला जात आहे.
एनआयएच्या हाती पुरावे
काही दिवसांपूर्वी एनआयएने काश्मीरमध्ये एका ठिकाणी, पंजाब व हरियाणात प्रत्येकी एक आणि बिहारमध्ये १२ ठिकाणी छापे टाकून शस्त्रांचा मोठा साठा व १३ लाखांची रोकड जप्त केली होती. यादरम्यान एनआयएला शस्त्रास्त्र तस्करीतील एका व्यक्तीची डायरीदेखील सापडली होती. या डायरीत देशभरातील शस्त्र तस्करांविषयीची महत्त्वाची माहिती तपास संस्थेच्या हाती लागली. मणिपूरमध्ये कुकी- मैतेईमधील जातीय हिंसाचार वाढण्यात बिहारमधून तस्करीद्वारे पाठवलेल्या शस्त्रास्त्रांची मोठी भूमिका राहिली.