नांदेड : देशात झालेल्या पहिल्या चरणामधील निवडणुकीत भाजपला (एनडीए) चांगली साथ मिळाली आहे. गरिबांच्या हितासाठी एनडीए काम करत आहे. देशाच्या विकासासाठी मतदारांनी आपकी बार चारसौ पार पूर्ण करावा मराठवाड्याच्या विकासासाठी मतदारांनी भाजपला साथ द्यावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. नांदेड लोकसभा मतदारसंघातील भाजपा महाविकास आघाडीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर व हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार बाबुराव कोहळीकर यांच्या प्रचारार्थ नांदेड येथे मोदी मैदानावर शनिवारी सकाळी अकरा वाजता आयोजित केलेल्या सभेत बोलताना व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणाले की, भाजपाने गरिबांना साथ दिली आहे. प्रधानमंत्री आवास योजना, शेतक-यांना किसान योजनेसाठी भरीव निधी सन्मान योजना अन्य तरतूद केली आहे. गरिबांना मोफत धान्य, शौचालय यासारख्या अनेक योजना भाजप सरकारने राबविल्या आहेत. काँग्रेसकडे कोणताही मुद्दा राहिला नाही केवळ विरोध म्हणून काँग्रेस विरोध करत आहे. मतदानाचा हक्क शंभर टक्के नागरिकांनी बजवावा. लोकतंत्रसाठी सर्वांनीच मतदान करणे आवश्यक आहे. देशहितासाठी मतदान करा असे आवाहन यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. नांदेडला समृद्धी महामार्गासह एअरपोर्ट यासारखी अनेक विकास कामे केली. नांदेडचा विकास होत आहे. मराठवाडा व महाराष्ट्र मला पुढे न्यायचा आहे त्यासाठी नांदेडमधून भाजपाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर व हिंगोलीमधून शिवसेनेचे उमेदवार बाबुराव कोहळीकर यांना मतदारांनी भरघोस साथ द्यावी.
मोदींचे हात बळकट करावे असे आवाहन यावेळी बोलताना केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, नांदेड लोकसभेतील भाजपाचे उमेदवार खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार बाबुराव कोहळीकर यांची भाषणे झाली. कार्यक्रमास महाविकास आघाडीचे राज्यातील पदाधिकारी, आमदार, खासदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इंडिया आघाडी स्वार्थासाठी एकत्र
महायुतीचे उमेदवार प्रताप चिखलीकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नांदेड दौ-यावर आहेत. यावेळी झालेल्या जाहीर सभेत बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येईल, असा विश्वास व्यक्त करत इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. पहिल्या सत्रात एनडीएच्या बाजूने मतदान झाले आहे. ज्या लोकांनी मतदान केले नाही, त्यांनी मतदान करा, कोणालाही करा पण मतदान करा. देशाचे भविष्य उज्ज्वल करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. इंडिया आघाडीचे लोक भ्रष्टाचार लपविण्यासाठी एकत्र आले आहेत. त्यांच्यामध्ये निवडणूक लढण्याची हिंमत नाही. इंडिया आघाडीचे २५ टक्के उमेदवार असे आहेत की जे एकमेकांच्या विरुद्ध लढत आहेत.
शिवाजी महाराजांचे नाव घेऊन मराठीतून सुरुवात
नांदेडमधील सभेत बोलतानाही मोदींनी शिवाजी महाराजांचे नाव घेऊन मराठीतून सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज, संत सेवालाल महाराज की जय. सर्वाना राम राम नांदेड आणि हिंगोलीकरांना माझा नमस्कार.. २६ तारखेची तयारी झाली आहे ना? असा प्रश्न विचारत मोदींनी स्थानिकता जपण्याचा प्रयत्न केला. एनडीए सरकारमुळे देशात विकास होत असल्याचे सांगताना इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला. तुम्ही पाहाल ४ जूननंतर इंडी आघाडी एकमेकांत लढत आहे. ४ जूननंतर हे सर्वजण एकमेकांचे कपडे फाडतील, एकमेकांचे केस ओढतील, असा टोलाही मोदींनी नांदेडमधील सभेतून लगावला.
व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, उमेदवार खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, खा. डॉ. अजित गोपछडे, संघटनमत्री संजय कौडगे, महायुतीचे ंिहगोलीचे उमेदवार बाबुराव कदम, माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, माजी राज्यमंत्री भास्करराव पाटील खतगावकर, माजी मंत्री डॉ.माधवराव किन्हाळकर, आ. राम पाटील रातोळीकर, आ. भिमराव केराम, आ. तुषार राठोड, आ. राजेश पवार, आ. बालाजीराव कल्याणकर, आ.संतोष बांगर, आ.तानाजी मुटकूळे, आ. राजू नवघरे, आ.नामदेव ससाणे, लोकसभा समन्वयक व्यंकटराव पाटील गोजेगावकर, प्रदेश सचिव देविदास राठोड, जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, जिल्हाध्यक्ष ंिहगोली फुलाजी शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष आरपीआय विजय सोनवणे, महिला मोर्चा अध्यक्षा सौ.पुनमताई पवार, प्रदेश उपाध्यक्षा महिला मोर्चा सौ.प्रणिताताई देवरे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, शिवसेना जिल्हाध्यक्ष आनंदराव बोंढारकर, भाजप नेते श्रावण पाटील भिलवंडे, बालाजी बच्चेवार आदींची उपस्थिती होती.