मुंबई : प्रतिनिधी
ट्यूशन क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढल्याने विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून १६ वर्षांखालील मुलांना ट्यूशन क्लासेसमध्ये प्रवेश देण्यास बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यातूनही कुठे क्लासेसमध्ये प्रवेश दिला किंवा खोटा प्रचार करून जाहिरातबाजी केली तर संबंधित ट्यूशन क्लासेसला १ लाखापर्यंत दंड ठोठावला जाईल, असे स्पष्ट केले आहे. एवढेच नव्हे, तर क्लासेसच्या विरोधात कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. त्यामुळे ट्यूशन क्लासेसच्या धंद्याला चाप बसणार आहे.
खासगी कोचिंग क्लासच्या बेफाम वाढीला लगाम घालण्यासाठी केंद्रीय मंत्रालयाने पावले उचलत एक नियमावली तयार केली आहे. या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करणा-या संस्थांना १ लाख रुपयांपर्यंत दंड किंवा जास्त शुल्क आकारल्यास नोंदणी रद्द करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, ट्यूशन क्लासेसंबंधी एक रिपोर्ट जारी करण्यात आला असून, अलिकडे ट्यूशन क्लासेसला धंद्याचे स्वरूप आल्याने जवळपास ७० टक्के पालकांनी ट्यूशन क्लासेसला असाच लगाम घालण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. कारण खोटे आमिष दाखवून क्लासेसमध्ये प्रवेश दिला जातो. मात्र, प्रत्यक्षात पालक आणि पाल्यांची निराशा होते. त्यामुळे ट्यूशन क्लासेसला चाप बसविण्यासाठी केंद्राने महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.
दुसरीकडे जवळपास ३० टक्के पालकांनी ट्यूशन क्लासेसचे समर्थन केले आहे. कोणत्याही पालकांना आपली मुले अव्वल दर्जाची असावीत, असे वाटते. त्यासाठी ट्यूशन क्लासेसची गरज असते. कारण शाळेत विद्यार्थी संख्या मोठी असल्याने वैयक्तिक लक्ष दिले जात नाही. त्यामुळे कुणी पैसे देऊन क्लासेसमध्ये प्रवेश देत असेल, तर त्याला बंधने नसावित, अशी भूमिका या पालकांनी घेतली. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्णयावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. परंतु बहुतांश लोकांचा खाजगी ट्यूशन क्लासेसला विरोधच आहे.