नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादिया एका मोठ्या वादात अडकला आहे. कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे रणवीरवर सर्वच क्षेत्रातून टीकेची झोड उठली. त्यावरून तो चांगलाच अडचणीत आला असून, त्याच्या विरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले असून, त्याच्याविरोधात सुप्रीम कोर्टात खटला सुरू झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली असून, त्याला पासपोर्ट देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. त्यामुळे त्याला जोरदार झटका बसला आहे.
रणवीरने आपल्या शोमध्ये एका सहभागी स्पर्धकाला एक आक्षेपार्ह प्रश्न विचारला होता आणि त्यानंतर रणवीरवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. या प्रकरणी रणवीर अलाहाबादियाने माफीही मागितली. मात्र, तरीही त्यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी दाखल झाल्या. आता रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाने एक धक्का दिला. रणवीर अलाहाबादियाने पासपोर्टची मागणी केली होती. मात्र, ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे सध्या तरी रणवीर अलाहाबादियाला पासपोर्ट मिळणार नाही. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी २ आठवड्यांनी होणार आहे.
गुवाहाटी, मुंबई आणि जयपूरमध्ये रणवीर अलाहाबादियाच्या विरुद्ध दाखल झालेल्या एफआयआरमध्ये अटकेपासून संरक्षण देण्याच्या अंतरिम आदेशाची मुदत न्यायालयाने वाढवली. दरम्यान, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आज सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणाची चौकशी दोन आठवड्यात पूर्ण होईल. दरम्यान, तोपर्यंत रणवीर अलाहाबादियाला पासपोर्ट देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.