बारामती : लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे पवार कुटुंबात काहीतरी घडत असल्याचे दिसत आहे. पवार कुटुंबातील नाराजी आता प्रकर्षाने समोर येत असून जाहीर कार्यक्रमातूनही ती दिसत आहे. बारामतीत सुरू असलेल्या राज्य सरकारच्या नमो महारोजगार मेळाव्यात आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर होते. एकमेकांच्या बाजूलाच उभे होते. पण दोघांनीही एकमेकांकडे पाहणे आणि भेटणे टाळले. सुप्रिया सुळे सर्वांना भेटल्या. विचारपूस केली. पण दादांची विचारपूस केली नाही. यापूर्वी पवार कुटुंबात असे कधीच घडले नव्हते. बारामतीकरांनी मात्र हे चित्र पहिल्यांदाच पाहिले. त्यावेळी अनेकांना आश्चर्यही वाटले.
बारामतीत नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित आहेत. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सर्व मान्यवर स्टेजवर आले. यावेळी सर्वांनी एकमेकांना नमस्कार केला. विचारपूस केली. सुप्रिया सुळेही स्टेजवर आल्या. त्यांनी स्टेजवर आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नमस्कार केला. मुख्यमंत्र्यांच्या बाजूलाच अजितदादा होते. त्यांना बायपास करून सुप्रिया सुळे पाठीमागून गेल्या. समोर देवेंद्र फडणवीस येताच त्यांनाही सुप्रिया सुळे यांनी नमस्कार केला. त्यांची विचारपूस केली.
विजय शिवतारे यांचीही भेट घेतली. पण बाजूलाच असलेल्या अजितदादांची साधी विचारपूसही केली नाही किंवा भेटल्याही नाहीत. सुप्रिया यांनी सुनेत्रा पवार यांचीही भेट घेतली. पण अजितदादांना भेटणं टाळलं. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं. इतकेच नव्हे तर सुप्रिया सुळे स्टेजवर असल्याचे अजितदादांनाही माहीत होते. त्यांनीही सुप्रिया यांना भेटणं टाळलं. बारामतीकरांसाठी हे चित्र नवं होतं. हे चित्र पाहून बारामतीकरांनाही आश्चर्य वाटलं.
पहिल्या रांगेत सुनेत्रा पवार
यावेळी स्टेजवरील पहिल्या रांगेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या एका बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार होते. दुस-या बाजूला देवेंद्र फडणवीस होते. फडणवीस यांच्या बाजूला शरद पवार बसले होते. सुप्रिया सुळेही या रांगेत बसलेल्या होत्या. पहिल्या रांगेत सुनेत्रा पवारही बसलेल्या होत्या. लोकप्रतिनिधी नसतानाही त्यांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले होते. एरवी कोणत्याही राजकीय कार्यक्रमात सुनेत्रा पवार नसतात. पहिल्यांदाच त्या जाहीर राजकीय कार्यक्रमात सामील झाल्या. त्यामुळे सुनेत्रा पवार या बारामतीतून लढणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
पवारांचे नाव घेताच टाळ्यांचा कडकडाट
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शरद पवारांचे नाव सत्कारासाठी जाहीर केल्यावर पँडोलमध्ये एकच आवाज झाला. शरद पवार यांचे नाव सत्कारासाठी पुकारल्यावर विद्यार्थी वर्गातून मोठ्याप्रमाणात हुंकार भरत टाळ्या वाजवण्यात आल्या. यावेळी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.