सोमेश्वरनगर : विधानसभेच्या अपयशानंतर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे अॅक्शन मोडवर आल्या असून दोन दिवसांपूर्वी बारामतीत दूध व कांद्याच्या भावासंदर्भात आंदोलन केले होते. खा. सुळे आज सोमेश्वर कारखाना व माळेगाव कारखान्यावर ऊस उत्पादक सभासदांच्या ऊसाला मिळालेला पाहिल्या हप्त्याबाबत दोन्ही कारखान्यावर येत आहेत. त्यानिमित्ताने खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर खा. सुप्रिया सुळे यांची साखर कारखानदारीत एंट्री होत आहे.
आज सकाळी १० वाजता सोमेश्वर कारखाना व सकाळी ११ वाजता माळेगाव कारखान्यावर खासदार सुळे येणार असून ऊस उत्पादकांना मिळालेला पहिला हप्त्याबाबत कार्यकारी संचालक व संचालक मंडळ यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर त्या पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. माळेगाव कारखान्यात १९८० सालापासून शरद पवार यांच्या विचाराचे संचालक मंडळ काम करत होते. तर सोमेश्वर कारखान्यात १९९२ पासून शरद पवार यांच्या विचाराचे संचालक मंडळ काम करत होते. शरद पवारांनी हळूहळू ही धुरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिली.
आजतागायत सोमेश्वर, माळेगाव व छत्रपती कारखान्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचाराचे संचालक मंडळ काम करत आहे. शरद पवारांनंतर साखर कारखानदारीचे सर्व सूत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याकडे घेतल्याने तसा खासदार सुप्रिया सुळे यांचा फारसा साखर कारखानदारीशी संबंध आला नाही. खा. सुळे या पहिल्यांदाच उद्या सोमेश्वर व माळेगाव कारखान्यावर ऊस उत्पादकांच्या न्याय हक्कासाठी या दोन्ही कारखान्यावर येत आहेत. तसेच येत्या महिनाभरात माळेगाव कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागत आहे. तर दोन वर्षात सोमेश्वर कारखान्याची निवडणूक होणार आहे. त्यानिमित्ताने खासदार सुळेंची एंट्री सर्वांच्या भुवया उंचावणारी आहे.