हैदराबाद : तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. हैदराबादच्या यशोदा हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया केली. केसीआर यांचा बाथरूममध्ये पाय घसरल्याने त्यांना फ्रॅक्चर झाले होते. अपघातानंतर त्यांना हैदराबाद येथील यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, बीआरएस आमदारांनी केसीआर यांची विधानसभेत बीआरएस नेते म्हणून एकमताने निवड केली आहे.
यशोदा हॉस्पिटलने जारी केलेल्या बुलेटिननुसार, सीटी स्कॅनमध्ये त्यांना फ्रॅक्चर झाल्याचे समोर आले होते. यासाठी हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया आवश्यक होती, जी करण्यात आली आहे. त्यांना बरे होण्यासाठी ६ ते ८ आठवडे लागण्याची शक्यता आहे. केसीआर यांचा मुलगा केटीआर रामराव यांनी सांगितले की, लवकरात लवकर बरे होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उत्तम वैद्यकीय व्यवस्थेबाबत सूचना दिल्या आहेत.