छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
येथील मिनी घाटी रुग्णालयात दोन सर्जन असल्याने दिवसाला तीन ते चार शस्त्रक्रिया नियमित होत होत्या. त्यामुळे गरिबांना मोठा फायदा व्हायचा. परंतु त्यातील एका सर्जनला पदोन्नती मिळाली तर दुसरे सर्नज सेवानिवृत्त झाल्याने रुग्णालयात हर्निया, हायड्रोसील, लहान मोठ्या गाठी, अपेंडिक्स अशा शस्त्रक्रिया रखडल्या असल्याने गरीब रूग्णांचा त्याचा फटका बसला आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात (मिनी घाटी) ग्रामीण भागातील रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. विविध शस्त्रक्रिया मोफत होतात. या रुग्णांच्या सेवेसाठी दोन जनरल सर्जन नेमले होते. यामुळे दररोज तीन ते चार शस्त्रक्रिया नियमित होत होत्या. परंतु यातील सर्जन डॉ. मुजफ्फर मणियार यांना एप्रिल महिन्यात पदोन्नती मिळाली. तर सर्जन डॉ. बाळासाहेब शिंदे हे ३० जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे मिनी घाटी रुग्णालयात आता सर्जनच्या दोन्ही जागा रिक्त झालेल्या आहेत. या जागा भरण्यासाठी मिनी घाटी प्रशासनाने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे.